गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावर उड्डाणपूल, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱया आणि वाहतूककोंडी फोडणाऱया गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यासाठीच्या गोरेगाव येथील उड्डाणपुलाचे भूमिपूजन आज पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची लांबी 12.2 किलोमीटर असून पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगाव पूर्व येथील ओबेरोय मॉल ते पूर्व द्रुतगती मार्ग मुलुंड पूर्व येथील ऐरोली नाका चौकापर्यंत हा जोडरस्ता असणार आहे.

उड्डाणपुलाच्या भूमिपूजनप्रसंगी बोलताना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत होणाऱया विकासकामांची माहिती दिली. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन मुंबईत विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प सध्या प्रगतिपथावर आहेत. मुंबईसारख्या महानगरात दक्षिण उत्तर वाहतूक सेवा-सुविधा मोठय़ा प्रमाणात आहेत. मात्र या तुलनेत पूर्व-पश्चिम भागांना वाहतूक सेवा सुविधा वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थेद्वारे मुंबईला ‘वृक्ष नगरी’चा बहुमान नुकताच प्राप्त झाला असल्याचे सांगत त्यांनी यावेळी पालिकेचे कौतुकही केले. यावेळी शिवसेना नेते-खासदार गजानन कीर्तिकर, आमदार रवींद्र वायकर, सुनील प्रभू, ऍड. सुहास वाडकर, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, उपायुक्त विजय बालमवार, उल्हास महाले आदी उपस्थित होते.

कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱयांना फायदा

गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यामुळे मुंबईतील नागरिकांना फायदा होणारच आहे, शिवाय विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱया नागरिकांनादेखील भविष्यात गाडी पकडण्यासाठी वळसा घालण्याची गरज पडणार नाही व तुलनेने कमी वेळात आपल्या गावी पोहोचता येईल, असे खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले. यावेळी आमदार सुनील प्रभू यांनीदेखील मुंबईत झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला.