
ग्रामीण भागात जे शिकायला मिळते ते शहरी भागात मिळत नाही. शेताच्या बांधावर शेतकरी, मायभगिनी, कामगारांशी गप्पा मारताना त्यांच्याकडून जे काही समजते, मार्गदर्शन मिळते त्यातून राज्याच्या जडणघडणीसाठी मदत होते. त्यामुळे महाराष्ट्र अधिकाधिक समृद्ध कसा होईल याकडेच आता महाविकास आघाडीचे लक्ष असून त्या दृष्टीने कामकाज सुरू आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील कोळवाडे येथे दंडकारण्य अभियानाच्या सांगता समारोपप्रसंगी आनंद मेळाव्यात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे बोलत होते. ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये बेस्ट ऑफ इलेव्हन पद्धतीने खेळाडूंची निवड करून एक चांगला संघ निर्माण केला जातो, त्याच पद्धतीने महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वजण बेस्ट आहेत. असे आदित्य ठाकरे म्हणाले.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, महाराष्ट्रात तरुण आमदार आणि मंत्र्यांचे जोरदार काम सुरू आहे. राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळाचे खातेवाटप सुरू असताना कोणतेही मंत्रीपद मिळाले असते; परंतु स्वतःहून पर्यावरण खाते मागून घेऊन आदित्य ठाकरे यांनी चांगले काम करून दाखवले आहे. त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. पर्यटन, पर्यावरण कशा प्रकारे असावे याचा एक आदर्श ते निर्माण करीत आहेत. मुंबईतल्या ऐतिहासिक वास्तूंचे टुरिझम त्यांनी सुरू केले आहे. ही कल्पकता अतिशय चांगली आहे. बारीकसारीक गोष्टींचा अभ्यास करण्याचे काम ठाकरे नेहमी करतात. देशपातळीवरसुद्धा काम करण्याची संधी त्यांना भविष्यात मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या शांत स्वभावामुळेच सरकार स्थिर – बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र सरकार स्थिर असून चांगल्या प्रकारे काम सुरू आहे. याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आहे. त्यांचा अतिशय शांत, मनमिळावू व प्रेमळ स्वभाव, महाराष्ट्राविषयी, शेतकऱयांविषयी असलेली कळकळ आणि मनापासून काम करण्याची जिद्द यामुळे त्यांनी कोरोनाबरोबरच वादळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा विविध संकटांतून महाराष्ट्राला सावरले आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यांनी जमिनीवर बसून साधला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद
संगमनेर तालुक्यातील कोळवाडे येथील जयहिंद आदिवासी आश्रमशाळेला पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत जमिनीवर बसून हसतखेळत संवाद साधला. आदित्य ठाकरे यांनी कोणतीही औपचारिकता न पाळता ते थेट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन मांडी घालून बसले. आदिवासी दुर्गम खेडय़ापाडय़ातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांचा मुलगा आणि मंत्री आपल्यासोबत बसून गप्पा मारताहेत यावर विद्यार्थ्यांचा विश्वास बसत नव्हता. आदित्य ठाकरे यांनी प्रेमाने त्यांच्या बोलीभाषेत पर्यावरण जागृती, वृक्षसंवर्धन आणि संगोपन याबाबत दिलखुलास संवाद साधला.































































