बीसीसीआय शहीद जवानांच्या बलिदानापेक्षा मोठी आहे का? आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानला युद्धाचा इशारा दिला होता, त्यानंतर सोमवारी पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपुल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो जरदारी यांनी देखील हिंदुस्थानला धमकी दिली. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकार व बीसीसीआयला फटकारले आहे.

पाकिस्तान आपल्याला धमकी देतोय आणि आपली सरकार काय करतेय तर बीसीसीआयला पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला सांगतेय. बीसीसीआयचे अधिकारी गेल्या वर्षी पाकिस्तानी क्रिकेटपटूंसोबत पार्टी करत होते. बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार झाले तरी आपण बांग्लादेशसोबत क्रिकेट खेळलो. ही बीसीसीआय आपल्या देशापेक्षा, हिंदूंपेक्षा, आपल्या शहीद जवानांच्या बलिदानापेक्षा मोठी आहे का? असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

आम्ही काय खायचे ते तुम्ही सांगू नका

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी 15 ऑगस्ट रोजी त्यांच्या हद्दीतील सर्व कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीच्या आयुक्तांना फटकारले आहे. ”कल्याण डोंबिवलीच्या आयुक्तांना निलंबीत केले पाहिजे. स्वातंत्र्यदिनी आम्ही काय खायचे ते त्यांनी सांगू नये. नवरात्रीतही आमच्यात देवीला नॉ़नव्हेजचा प्रसाद देण्याची पद्धत आहे. आम्ही याचा कडकडून विरोध करू. 15 ऑगस्ट व्हेज खा, नॉनव्हेज खा हे सांगण्याचा अधिकार महापालिकेला नाही. आम्ही जाहीर आव्हान करतो की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खा. आमच्या राज्यात येऊन तुम्ही आमच्यावर शाकाहार लादताय का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.