
महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्य अभिमानास्पद असून सागरी पर्यटन, तीर्थयात्रा, वारसा स्थळे, पर्यावरण आणि कृषी पर्यटनातील संधींना आम्ही प्रोत्साहन देत आहोत. राज्यातील पर्यटकांना जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी आम्ही विविध धोरणांचा अवलंब करत राहू, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. ‘ओयो संवाद’ या वेबिनारमध्ये ते बोलत होते.
हॉटेल व्यवसायातील उद्योजकांना प्रोत्साहन देणे, या व्यवसायासाठी पूरक धोरणे अवलंबून पर्यटनाला गती देणे आणि येथील पर्यटन संधींची जगाला जाणीव करून देणे या गोष्टींवर लॉकडाऊनच्या काळात आमचा भर राहिल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
हॉटेल आणि पर्यटन व्यवसायाची भविष्यातील वाटचाल आणि कोरोनाच्या काळात राज्य सरकारने या व्यवसायाला उभारी देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला. राज्यात पर्यटन, हॉटेल व्यवसायात अमर्याद संधी आहेत. त्यातून मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यासोबत राज्याला महसूलही मिळतो.
पर्यटकांसाठी स्वस्त, सुरक्षित आणि आरोग्यकारी आतिथ्य उपलब्ध करण्याच्या ओयोच्या प्रयत्नांना आमचा पाठिंबा असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
कोण कोण होते हजर!
ओयो हॉटेल्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश अगरवाल, ओयो इंडिया आणि दक्षिण आशिया विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कपूर आणि पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य प्रधान सचिव वल्सा नायर-सिंग यांच्यासह ओयोच्या 170 हॉटेल सदस्यांची वेबिनारमध्ये उपस्थिती होती.
महाराष्ट्र ही पर्यटन व्यवसायाची मोठी बाजारपेठ असून पर्यटकांना सुरक्षित आणि आरामदायी वातावरणात राहता यावे यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे रितेश अगरवाल यावेळी म्हणाले.

























































