
कोविड काळातल्या फेसबुक लाईव्हवर भाजप आणि मिंधे गटाने टीका केली होती. पण, मणिपूरवर केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची बोलण्याची हिंमत तरी आहे का? असा रोखठोक सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. येवला येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कोविड काळातील शिवसेना आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कामाविषयी संवाद साधताना त्यांनी भाजप आणि मिंधे गटावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, हा कदाचित योगायोग असेल पण या नाशिक परिसरात आणि या जिल्ह्यात बरोबर या तारखेला मागच्या वर्षीही मी होतो. तेव्हा मी मनमाडला होतो. तेव्हा टशन सुरू होते. कोणी होर्डिंग्स लावली होती. ज्यांना आपल्या लोकांना पळवायचं होतं त्यांनी पळवले. आता त्यांची परिस्थिती ओके नाही, कारण आता लांबत चाललेय सगळे आणि आजपण मागच्या वर्षीच्या आठवणी होत्या. गद्दारीला, खोक्यांना 1 वर्ष झाले. गावागावात 50 खोके एकदम फेमस झालेले आहे. जे आहे ते नाकारू शकत नाहीय. अजून पण बघा 1 वर्ष झालं जे 50 खोके ओरडतात त्यांच्या मागे पोलीस लावले जातात. त्यांच्यावर धाडी टाकल्या जातात, केसेस केल्या जातात पण एक सुद्धा त्या गद्दारातून उठला नाही आणि बोलला नाही की आम्ही 50 खोक्यांनाहात लावला नाही. गद्दारीचा शिक्का माथ्यावर आहे तो आहेच. पण यांचे कारनामे एवढे वाढले आहेत आणि जनतेसमोर यायला लागले आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.
खोके सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, या एका वर्षात खंत एवढीच आहे दुख: एवढेच आहे विरोधी पक्षात बसल्याचे नाही. विरोधी पक्षात आपण अनेक वर्ष होतो. हे अनुभव येत असतात,जात असतात. सरकार येतं जातं. आपण सरकार आणू आणि नक्की आणू. ताकद आहे, क्षमता आहे आणण्याची आणि तुमचे प्रेमही आहे आशिर्वादही आहे. पण या एका वर्षामध्ये महाराष्ट्र केवढा मागे गेला आहे हे पाहून दु:ख होतं. कुठचंही क्षेत्र पाहिल, राज्य पाहिलं, शहर पाहिलं, गाव बघितंल जो काही आनंदाचा क्षण महाराष्ट्राला देऊ शकत होतो, जो काही सुवर्णकाळ महाराष्ट्राला दाखवत होतो. मला माहित आहे आपलं जेव्हा सरकार बसलं तेव्हा दोन तीन महिन्यात कोविडचा काळ सुरू झाला. लॉकडाऊन आपल्याला करायला लागले. पण त्या कोविडच्या काळात देखिल कुठेही होर्डिंग्स, बॅनर न लावता काम सुरू होतं. आता सगळीकडे निर्लज्जासारखे बॅनर दिसतेय आपल्याला. पहिले दोन जणांचे दिसायचे आता अजून एक त्यात दिसतायत. हे सरकार आता जेवढं होर्डिंग आणि बॅनरवर दिसतय तेवढं घोषणांमध्ये सरकार आहे. पण हे सरकार तुमच्या पर्यंत पोहोचले आहे का? तुमच्या खिशात पोहोचलं आहे पण तुमच्या मनात पोहोचले आहे का खोके सरकार? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
कोविड काळातील शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कामविषयी पुनरुच्चार करताना आदित्य ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारमधील सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढले. ते म्हणाले की, कोविड काळात देखिल जगात जी डब्युएचओ नावाची संघटना आहे. तिथून जागतिक जे काही कोविडचे काम सुरू होते. त्या संघटनेने देखिल सांगितले महाराष्ट्र मॉडेल बघा , मुंबई मॉडेल बघा. देशभरातून वेगवेगळ्या टिम यायच्या दिल्लीतून वेगवेगळ्या टीम यायच्या वरळीत असेल, धारावीत असेल जिथे जिथे आम्हाला स्लम सोसायटीज, हाय सोसायटीज दिसायच्या की मुंबईमध्ये कोविडचे कंट्रोल कसे चालले आहे आणि तुम्ही मुंबईकर, पुणेकर, नाशिकर, नागपूरकर म्हणून जी यंत्रण उद्धव साहेबांनी लावलेली ही अनुभवलेली आहे. एक तुमची काळजी घेणारा संवेदनशील मुख्यमंत्री प्रत्येकाला वाटणारा हा आपला माणूस आहे, माझा माणूस आहे. माझा आवाज म्हणजे उद्धव ठाकरे साहेब आहेत. हे वाटणारे मुख्यमंत्री जेव्हा टिव्हीवर यायचे फेसबुक लाईव्ह असेल पण संवाद तरी साधायचे. एका बाजूला तुम्ही विचार करा कोविडच्या काळात संवाद साधणारे आणि भाजप आणि मिंधे गटाने अनेकदा टीका करायचे की ते फक्त फेसबुक लाईव्हमधूनच यायचे. अरे पण संवाद साधायचे, बोलायचे तरी. मणिपूरवर केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची बोलण्याची तरी हिंमत आहे का? महिलांवर अत्याचार होतोय तिथे दंगली होत आहेत त्यावर बोलायला कोणी तयार नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.


























































