पुन्हा एकदा निर्लज्जपणे… अटल सेतूच्या भ्रष्ट कामावरून आदित्य ठाकरे यांचा मिंधे, भाजप व MMRDA वर निशाणा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याअंतर्गत येणाऱ्या MMRDA ने मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या (अटल सेतू) रस्त्याच्या कामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या रस्त्याचे उद्घाटन होऊन एक वर्षच झाले असतानाही अनेकदा या रस्त्याच्या पृष्ठभागाचे काम करावे लागले. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे, भाजप व MMRDA वर निशाणा साधला आहे.

MMRDA ने अटल सेतूच्या कामाचा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. तो व्हिडीओ शेअर करत आदित्य ठाकरे यांनी भाजप, मिंधे गट व MMRDAला धारेवर धरले आहे. ”जगातील इतर कोणत्याही देशात अशा प्रकारचा भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. फेकनाथ मिंधे आणि भाजप यांच्या कार्यकाळात इतका भ्रष्टाचार झालाय की मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या (अटल सेतू) रस्त्याच्या कामातही भ्रष्टाचार झालाय. या ट्रान्स हार्बर लिंकचे गेल्या वर्षी उद्घाटन झाले होते. त्यानंतर अनेकदा या पूलाच्या रस्त्याचे काम करण्यात आले आणि आता एमएमआयडीए निर्लज्जपणे पुन्हा एकदा रस्त्याच्या कामाचा व्हिडीओ टाकत आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.