
‘उत्तर प्रदेशातील जनतेला भाजपाने फक्त स्वप्ने दाखवली. तिरस्कार आणि भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.’ असा घणाघात शिवसेना नेते, महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. उत्तर प्रदेशातील डुमरियागंज येथील निवडणूक प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. लवकरच आपण शिवसेनेच्या विजयी सभेलाही येऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोराव मतदारसंघात झालेल्या आदित्य ठाकरे यांच्या सभेलाही प्रचंड गर्दी झाली होती.
डुमरियागंज विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार राजू श्रीवास्तव यांच्या प्रचारासाठी सिद्धार्थनगर येथे आयोजित सभेला प्रचंड गर्दी झाली होती. उत्तर प्रदेशात परिवर्तनाची लाट येत असल्याचे ही तुफान गर्दीच सांगत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. 2017 मध्ये उत्तर प्रदेशातील जनतेने समाजवादी पार्टीला पर्याय म्हणून भाजपाच्या हाती सत्ता दिली. त्यानंतर भाजपाने त्यांची आश्वासने पूर्ण केली का? असे आदित्य ठाकरे यांनी विचारताच उपस्थितांमधून ‘नाही’ असे उत्तर आले. चांगले शिक्षण मिळाले का? चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्या का? अशा आदित्य ठाकरेंच्या सवालांनाही उपस्थितांमधून नकारार्थी उत्तर मिळाले.
शेतकऱयांना माओवादी म्हणतात, लखीमपूर खेरीतील आरोपींबद्दल मात्र मौन
‘केंद्रामध्ये भाजपाचे सरकार 7 वर्षे तर उत्तर प्रदेशात पाच वर्षे आहे. त्यानंतरही भाजपाकडून द्वेषाचे राजकारण केले जात आहे. बहुमत मिळाल्यानंतर ते लोकशाहीची राजेशाही बनवू लागले आहेत.’ असे टीकास्त्र आदित्य ठाकरे यांनी सोडले. ‘जो हिंदू भाजपाला मत देणार नाही त्याच्या शरीरात दुसऱयाचे रक्त वाहत असणार.’ असे वक्तव्य करणाऱया भाजपा उमेदवाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याचाही समाचार आदित्य ठाकरे यांनी यावेळी घेतला. आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘प्रत्येकाने आपल्या धर्माच्या नियमांनुसार काम करावे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमी सांगायचे की आम्ही राजकारण सत्तेसाठी नव्हे तर सेवेसाठी करतो. माणसांच्या रक्ताचा रंग एकच आहे. चार वर्षांपूर्वी शेतकऱयांचा एक मोर्चा मुंबईच्या दिशेने येत होता. त्यांचा झेंडा लाल होता म्हणून भाजपाच्या लोकांनी त्यांना माओवादी, दहशतवादी म्हटले होते. यूपीच्या लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱयांच्या अंगावर गाडी घालणाऱयांना मात्र ते काहीच बोलत नाहीत. अशा भाजपाबरोबर आम्ही होतो याचा मला खेद वाटतो.’
‘प्रभू श्रीराम यांच्या खांद्यावर शोभणारा धनुष्यबाण ही शिवसेनेची निवडणूक निशाणी आहे. शिवसेनेने त्याच धनुष्यबाणाने कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक समस्यांवर तोडगा काढला आहे. शिवसेनेचे आमदार आणि खासदारांना आमदार-खासदार नव्हे तर वाघ म्हटले जाते,’ असे संजय राऊत म्हणाले.
अर्धी मुंबई हिंदी बोलते
‘अर्धी मुंबई हिंदी बोलते. त्यांच्याशी मी बोलतो तेव्हा समजते की प्रत्येक दहावा व्यक्ती हा सिध्दार्थ नगरातील असतो. सिध्दार्थ नगरातील दहा लोकांमागे प्रत्येक चौथा व्यक्ती हा डुमरियागंजचा असतो,’ असे संजय राऊत म्हणाले. शिवसेना द्वेषाचे राजकारण नाही तर राष्ट्रप्रेमाचे राजकारण करते असे त्यांनी ठामपणे सांगितले. या सभेला शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी आदी उपस्थित होते.
10 मार्चपर्यंत यूपीमधून ईस्ट इंडिया
कंपनीला निरोप – संजय राऊत
‘10 मार्चला लखनौमधून ईस्ट इंडिया कंपनीला निश्चितच निरोप मिळेल आणि त्यानंतर 2024 मध्ये दिल्लीतूनही त्यांना निरोप मिळेल. यावेळची विधानसभेची निवडणूक ही साधी निवडणूक नाही तर डुमरियागंजच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. या लढाईसाठी शिवसेना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेसारखी महाराष्ट्रातून आली आहे आणि आम्ही इथे का आलो हे 10 मार्चनंतर विरोधकांना समजेल’ असे याप्रसंगी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत भाजपाला उद्देशून म्हणाले. प्रचारसभेला मोठय़ा प्रमाणात झालेली गर्दी पाहून संजय राऊत यांनी, आपण राजू श्रीवास्तव यांच्या प्रचारासाठी नव्हे तर मुंबईतील एखाद्या प्रचारसभेसाठी आल्यासारखे वाटतेय असे सांगितले.
10 मार्चनंतर आदित्यनाथ ‘माजी’ असतील
10 मार्चनंतर मी पुन्हा येईन तेव्हा योगी आदित्यनाथ हे ‘माजी’ मुख्यमंत्री असतील, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. 23-24 मार्चला जनता कर्फ्यू लागला तेव्हा मुंबई महाराष्ट्रात राहणाऱया आपल्या लोकांना घरी यायचे होते. पण केंद्र सरकारने रेल्वे बंद केल्या. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री कल्याण निधीमधून रेल्वेभाडे देऊन सर्वांना त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था केली होती. महाराष्ट्र सरकारने 500 हून जास्त ठिकाणी त्यांच्यासाठी क@म्प लावून त्यांना तीन वेळचे जेवण, योगा शिबीर आणि आरोग्य सुविधांची व्यवस्था केली होती.’ याचीही आठवण आदित्य ठाकरे यांनी यावेळी करून दिली.



























































