
2024मध्ये अटल सेतूचे उद्घाटन झाले आणि पुढच्या वर्षभरातच या रस्त्याची दुर्दशा झाली. भाजप-मिंधे राजवटीच्या लुटमारीला अंत नाही. त्यांनी राज्यात अशाच प्रकारे लुटमार केली आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारच्या लुटमारीवर निशाणा साधला.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात अटल सेतूवरील रस्ता उखडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर एमएमआरडीएने पंत्राटदाराला 1 कोटीचा दंड ठोठावला आहे. एमएमआरडीए आणि महायुती सरकारच्या या अपयशावर आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून टीका केली. आमचे सरकार पाडले तेव्हा अटल सेतूचे काम 82 टक्के पूर्ण झाले होते. त्यानंतर फेकनाथ मिंधे आणि भाजप सरकार आमच्या राज्यावर लादण्यात आले. त्या वेळी रस्त्याच्या पृष्ठभागाचे काम सुरू झाले. उर्वरित कामाला दोन वर्षे लागली. 6 महिन्यांच्या विलंबानंतर 2024मध्ये अटल सेतूचे उद्घाटन झाले. मात्र आता एका वर्षात त्याचे नुकसान झाले आहे. भाजप-मिंधे राजवटीच्या लुटमारीला अंत नाही. त्यांनी आमच्या राज्यात हेच केले आहे, असे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.