
‘महाराष्ट्र कधीच झुकणार नाही, आम्ही लढा देत राहू’, अशी प्रतिक्रीया पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभेच्या सत्रानंतर दिली. विरोधकांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका करत आरोप केले. त्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खणखणीत उत्तरं देत त्यांच्या आरोपांची लक्तरे काढली.
”मला वाटतं मुख्यमंत्र्यांचा आजचा प्रत्येक शब्द हा महत्त्वाचा आहे. देशाची परिस्थिती काय आहे. देशात कशी अघोषित आणिबाणी आहे. आणि आम्ही महाराष्ट्रात जे काम करत आहोत. त्याच्यावर अगदी स्पष्टपणे व परखडपणे मुख्यमंत्री बोललेले आहेत. आपण बघितलं असेल जे काय चाललंय. महाराष्ट्रात किंवा इतर राज्यात. जिथे जिथे भाजपची सत्ता नाही तिथे धमकावणं, घाबरवणं. केंद्रीय यंत्रणा वापरणं हे सगळं सुरू आहे. मात्र आम्ही आधीही सांगितलं आहे. महाराष्ट्र झुकणार नाही. आम्ही लढा देत राहू” अशी प्रतिक्रीया आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
विरोधकांच्या आरोपांची मुख्यमंत्र्यांनी चिरफाड केली
विरोधकांना आरोप करण्याची सवयच झाली आहे. सकाळी उठले की आरोप करायचे. आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. मुख्यमंत्र्यांनी सर्व आरोपांची आज चिरफाड केली आहे. जे काही रेकॉर्डवर आहे ते मांडलंय. जनता आमच्या सोबत आहे. आम्ही काम करतोय व करत राहू. लढा देत राहू व सत्यासोबत राहू.” असे देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितले.



























































