
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदीत्य ठाकरे यांनी रविवारी कुडाळ तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेतीची शेतात जाऊन पाहणी केली. निवजे येथे त्यांनी शेतीच्या बांधावर बसून शेतकऱ्यांशी संवाद साधला. कसलीही चिंता करू नका, मनात वाईट विचार आणू नका, घाबरून जाऊ नका, नुकसान भरपाई प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. शिवसेना सदैव तुमच्यासोबत आहे. कधीही हाक मारा, शिवसेना तुमच्या मदतीसाठी निश्चितच धावून येईल असा विश्वास आदीत्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अवकाळी पावसामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आदीत्य ठाकरे रविवारी कोकण दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डेमार्गे निवजे येथे जात निवजे व माणगाव येथील नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी शेताच्या बांधावर जाऊन केली. उपस्थित अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा आढावा घेत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. निवजे देऊळवाडी व माणगाव बेनवाडी येथे आदित्य ठाकरे यांनी भातशेतीची पाहणी केली.
अवकाळी पावसामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकणात भातशेतीसह बागायती तसेच मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मला आज इकडे पाठवले आहे. आमचे मंत्री व आमदार यांनीही या नुकसानीची पाहणी केली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर शिवसेनेच्या सर्व आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. आता परत आम्ही राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांची भेट घेऊन नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई तातडीने मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. येथील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कृषी विभागामार्फत पंचनामे करण्याचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. दोन ते तीन दिवसांत पंचनामे करण्याचे काम पूर्ण होईल. नुकसान भरपाई प्रत्येक शेतकऱ्याला मिळवून दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
खासदार विनायक राऊत म्हणाले की, अवकाळी पावसामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी 80 कोटी रूपयांचे पीककर्ज माफ करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. हे कर्ज माफ होण्यासाठी ते निश्चितच प्रयत्न करतील. प्रत्येक शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना ठाम उभी आहे. प्रत्येकाला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. निवजे येथे आदित्य ठाकरे यांनी खाली बसून कुजलेले व कोंब आलेल्या भाताची पाहणी केली. त्यांनी सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली. यावेळी शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, पालकमंत्री ना. दीपक केसरकर, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, रमेश कोरगावकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, युवानेते संदेश पारकर, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, जि.प.सदस अमरसेन सावंत, राजू कविटकर, तालुका प्रमुख राजन नाईक, सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, नगरसेवक सचिन काळप, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, निवजे सरपंच वैभवी पालव, रमाकांत ताम्हाणेकर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण ,कृषी अधिकारी रमाकांत कांबळे,बाळकृष्ण परब आदीसह शेतकरी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे कोकणात येणार!
शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदीत्य ठाकरे म्हणाले की, आज मी कोकणात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलो आहे. सोमवारी मी नाशिकला जाणार आहे. लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर येणार आहेत.




























































