
बेस्टद्वारे सर्व वीज ग्राहकांकडून आकारण्यात येणाऱया विद्युत व्हीलिंग चार्जेसला आहार या हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने विरोध केला आहे. बेस्टने व्हीलिंग शुल्क प्रति युनिट 2.26 रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ही वाढ हॉटेल व्यावसायिकांना अमान्य आहे.
इंडियन हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन (आहार) या संघटनेशी संबंधित 8 हजारांहून अधिक हॉटेल्स आणि रेस्टॉरंटस्च्या संघटनेने बेस्ट उपक्रमाद्वारे सर्व वीज ग्राहकांकडून आकारण्यात येत असलेल्या व्हीलिंग चार्जेसविरोधात महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे (एमईआरसी) आक्षेप नोंदवला आहे. आहारच्या मते, बेस्टकडून किरकोळ वीज ग्राहकांना व्हीलिंग चार्जेस आकारणे बेकायदेशीर आहे आणि ते विद्युत अधिनियम आणि एमईआरसीच्या नियमांचे उल्लंघन आहे.
बेस्ट उपक्रम ‘किरकोळ पुरवठा व्यवसाय’अंतर्गत (रिटेल सप्लाय बिझनेस) ग्राहक शुल्क आकारत आहे आणि बेस्ट उपक्रम पुन्हा ‘वितरण वायर्स व्यवसाय’अंतर्गत आपल्या ग्राहकांना व्हीलिंग शुल्क आकारत आहे, जे आहारच्या मते बेकायदेशीर आहे. त्यामुळे आहारने व्हीलिंग चार्जेसला विरोध केला आहे, असे आहारविरोधी समितीचे अध्यक्ष गुरुप्रसाद शेट्टी, आहारचे अध्यक्ष सुकेश शेट्टी यांनी स्पष्ट केले.





























































