गुजरातमध्ये भाजपला ‘दिल्ली सरकार’चं आव्हान, 2022 साठी आजपासूनच सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरात राज्यात पुढल्या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. या राज्यात भाजप क्रमांक 1 चा पक्ष असून 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या. मात्र असे जरी असले तरी 2012 च्या निवडणुकीत जिंकलेल्या जागांपेक्षा 16 जागा कमी झाल्याने भाजपला मोठा झटका बसला होता. आता काँग्रेससह अन्य पक्षांनी देखील गुजरातमध्ये आपले पाय रोवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यात महत्त्वाचं नाव आहे ते आम आदमी पक्षाचे (आप – AAP).

आम आदमी पक्षाने शुक्रवारी गुजरातमधील प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये पानभर जाहिराती छापल्या आहेत. या जाहिराती छापल्यानंतर गुजरातमध्ये ‘आप’चीच चर्चा रंगली आहे. कोरोनाकाळात दिल्ली सरकारने उचलेली पावलं, मृतकांच्या कुटुंबीयांना दिल्ली सरकारकडून देण्यात येणारी मदत यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

delhi-govt

या जाहिरातींवरून स्पष्ट दिसत आहे की, ‘आप’ने गुजरातमध्ये पाय रोवण्यासाठी कंबर कसून तयारी सुरुवात केली आहे. पंचायत निवडणुकांमध्ये आपला चांगलं यश मिळालं होतं. ज्याची चर्चा देखील रंगली होती. या यशानंतर आता आपने आपली छाप पाडण्यासाठी वर्तमानपत्रातून दिल्ली सरकारच्या कोविडकाळातील कामांची माहिती देणाऱ्या जाहिराती छापल्या आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयांची मदत दिली जात आहे. असे या जाहिरातीत म्हटले आहे. यामुळे गुजरातमध्ये आपची चर्चा सुरू आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत आपला यश मिळालं नाही. मात्र भाजपचीही घसरण झाल्याचं दिसून आलं होतं. त्यातच पंचायत निवडणुकीत आपला काही भागात घवघवित यश मिळाल्यानं आपच्या आशा उंचावल्या आहे. गुजरात सोबत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबमध्ये देखील आप उमेदवार देणार असल्याचे कळते.