पंजाबमध्ये भाजपचा धुव्वा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपचे वर्चस्व; कोणाला किती जागा?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये विजयाचा आंनंदोत्सव साजरा करणाऱ्या भाजपला पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जोरदार झटका बसला आहे. बंगालनंतर पंजाब जिंकण्याचे स्वप्न पाहणारा भाजप या निवडणुकांमध्ये सर्वात शेवटी असून राज्यात सत्ताधारी ‘आप’ आघाडीवर आहे.

पंजाबमध्ये 26 मे रोजी 8 महापालिका, 95 नगर पालिका आणि 20 पंचायत समित्यांसाठी एकूण 1977 जागांसाठी मतदान झाले होते. त्यांची मतमोजणी आज झाली. या निवडणुकांमध्ये एकूण 7,555 उमेदवार रिंगणात होते. 79 उमेदवार बिनविरोध निवडण्यात आले. ‘आप’ने 954 वॉर्डमध्ये विजय मिळवून आघाडी घेतली. काँग्रेस 393, अकाली दल 192 आणि भाजपने 172 जागा जिंकल्या. मोहाली, बठिंडा, अबोहर, बटाला, मोगा, बरनाला या महापालिकेत आपने 50 पैकी 36 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. काँग्रेसने कपुरथला महापालिकेत 50 पैकी 31 वॉर्ड जिंकून बहुमत मिळवले. केवळ पठाणकोट वगळता इतर सर्व ठिकाणी भाजप पिछाडीवर आहे. महत्त्वाचे म्हणजे भाजपच्या 1,142 उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले आहे.

गेल्या महिन्यात राघव चड्ढा यांच्यासह आपच्या 7 खासदारांनी बंडखोरी करत भाजपमध्ये प्रवेश केला. हा गट भाजपमध्ये विलीन करण्यास राज्यसभा सभापतींनी मंजुरीदेखील दिली. पंजाबमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय उलथापालथ झाली. यापैकी बहुतांश खासदार पंजाबमधील होते. मात्र त्यांनी पक्षांतर केल्यानंतरही भाजपला या निवडणुकांमध्ये कोणताही फायदा झालेला नाही.

ईडी पार्टीचा सफाया झाला- केजरीवाल

पंजाबमधील शहरांमध्ये मतदारांनी सत्ताधारी पक्षावर विश्वास दाखवला. भरभरून मतदान करून भगवंत मान सरकारने केलेल्या कामांसाठी शाब्बासकी दिली, असे नमूद करताना आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या दारूण परभवावर भाष्य केले. ईडी पार्टीचा पंजाबमधून सफाया झाला. अगदी छोटया व्यापाऱ्यांवरही धाडी टाकून त्यांना त्रास देण्यात आला. लोकांनी त्याचा आज बदला घेतला, असे केजरीवाल यांनी नमूद केले.

  • आप 954
  • काँग्रेस  393
  • अकाली दल 192
  • अन्य 258
  • भाजप 172