अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील – आप नेत्या आतिशी

कथित अबकारी कर घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. त्यांच्या अटकेनंतर आप नेत्या आतिशी यांनी केजरीवाल हेच दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील, असं स्पष्ट केलं आहे.

केजरीवाल यांच्या अटकेनंतर काही वेळातच आम आदमी पार्टीतर्फे आतिशी यांनी ही प्रतिक्रिया दिली असून आता केजरीवाल कारागृहातून आपलं कर्तव्य बजावतील, असंही त्या म्हणाल्या आहेत. तसंच, ईडीने केलेल्या या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून आम्ही आज रात्रीच सर्वोच्च न्यायालयात तत्काळ सुनावणीची मागणी केली आहे, असंही आतिशी यांनी स्पष्ट केलं आहे.

हे एक राजकीय षडयंत्र असून या प्रकरणात 500हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश होता तरीही दोन वर्षांत त्यांना एक रुपयाही हस्तगत करता आलेला नाही, अशी टीकाही आतिशी यांनी केली आहे.