आपला माणूस – रुग्णसेवेचा वसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> माधव डोळे

निराधार आणि गरिबांची रुग्णसेवा एका सामाजिक बांधिलकीच्या भावनेने करणारे वैद्यकीय व्यावसायिक अपवादात्मक भेटतात. डॉ. रवींद्र आणि डॉ. सुरेखा जाधव हे दांपत्य त्यापैकीच एक. रुग्णसेवेचा ‘वसा’ त्यांनी घेतला आहे आणि माणुसकीच्या नात्याने तो जपला आहे.

रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा असे नेहमी म्हटले जाते. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सभोवताली प्रलोभने असतानाही निराधारांना आणि रुग्णांना आधार देण्याचा ध्यास एका डॉक्टर दाम्पत्याने घेतला आणि डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. स्वतःचा संसार घडीभर बाजूला ठेवून समाजासाठी सेवा देणाऱया या दाम्पत्याचे नाव आहे डॉ. रवींद्र आणि डॉ. सुरेखा जाधव. मुंबईतील आर. ए. पोतदार मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी स्वतःचा दवाखाना थाटला. त्यातून रग्गड पैसा कमवता आला असता. पण आपले संपूर्ण आयुष्य गोरगरीब आणि दीन रुग्णांसाठी खर्च करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. झोपडपट्टीत राहणाऱया एखाद्या गरीब रुग्णाला आजार झाल्यास त्याच्याकडे औषधे खरेदी करण्यासाठीदेखील पैसे नसतात हे लक्षात घेऊन डॉ. रवींद्र जाधव यांनी आपल्या सहकाऱयांच्या मदतीने डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. डॉक्टर हा रुग्णाचा मित्र असतो हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. रुग्णसेवा करत असतानाच डॉ. जाधव यांनी कल्याण पूर्वेतील मलंग रोड येथे अनेक अडचणींवर मात करून वृद्धाश्रम उभारण्यासाठी जागा घेतली. पण स्थानिकांच्या विरोधामुळे त्यास यश आले नाही. तरीही न डगमगता त्यांनी रुग्णसेवेचा वसा चालूच ठेवला. 2009 मध्ये न्यू रचना पार्क सोसायटीमध्ये डी.एम.सी.टी. हॉस्पिटल कम वृद्धाश्रम सुरू केला. सध्याच्या परिस्थितीत वृद्धाश्रम चालवणे अतिशय जिकिरीचे काम आहे. सरकारची एक रुपयाचीही मदत नाही. मोठय़ा संस्थेची देणगीही नाही. तरीही स्वतःची पदरमोड करीत त्यांनी हे कार्य पुढे सुरू ठेवले. सुमारे 45 बेडचा हा वृद्धाश्रम असून गेली दहा वर्षे अविरतपणे तो सुरू आहे. या वृद्धाश्रमात केवळ वृद्धच नव्हे तर लकवा, स्मृतिभ्रंश, बेडसोर्स झालेले रुग्णदेखील आहेत. ‘नो लॉस, नो प्रॉफिट’ या तत्त्वावर हे हॉस्पिटल चालवले जाते. उत्पन्न नसल्याने हॉस्पिटल कम वृद्धाश्रमाचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न नेहमीच सतावतो.

‘डी.एम.सी.टी’मध्ये 12 बेड हे फक्त निराधारांसाठी राखीव ठेवले आहेत. येथील वृद्ध तसेच रुग्णांना रोज सकाळ व रात्री पोटभर जेवण, चहा, नाश्ता दिला जातो. स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला असून नर्सेस तसेच अन्य स्टाफ मिळून 20 हून अधिक जण काम करतात. डॉ. जाधव यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी डॉ. सुरेखा यादेखील तेवढय़ाच उमेदीने रुग्णसेवा करीत आहेत. परदेशात राहणाऱया मुलांचे आई-वडीलदेखील या वृद्धाश्रमात राहिले आहेत. या दाम्पत्याने तीन मुलांना ‘दत्तक’ घेतले असून त्यांना माता-पित्याची माया दिली आहे. ही सर्व मुले चांगल्या ठिकाणी शिक्षणदेखील घेत आहेत. वाढदिवस म्हटला की, अनेकजण तो झगमगाटात साजरा करतात. पण डॉ. रवींद्र जाधव हे स्वतःचा वाढदिवस ‘अनाथ सहाय्यता दिन’ म्हणून दरवर्षी साजरा करतात. या दिवशी त्यांचे मित्र व सहकारी हॉस्पिटल कम वृद्धाश्रमासाठी मदतीचा हात पुढे करतात. डी.एम.सी.टी. हे केवळ हॉस्पिटल कम वृद्धाश्रम राहिले नसून ती एक चळवळ बनत आहे. डॉ. जाधव यांचे महाराष्ट्रात अनेक मित्र असून ते स्वतः विविध संस्थांशी जोडले गेले आहेत. या रुग्णसेवेसाठी त्यांनी सोशल मीडियाचादेखील चांगल्याप्रकारे वापर करून घेतला आहे. अनेक घटना तसेच स्वतःचे अनुभव ते फेसबुक तसेच व्हॉटस् ऍपच्या माध्यमातून शेअर करतात. www.dmcthospital.com ही वेबसाईटदेखील असून समाजाने या रुग्णसेवेसाठी पुढे यावे, असे आवाहन ते नेहमीच करीत असतात. सुसज्ज असा वृद्धाश्रम उभारावा हे त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी शहाडजवळील मानिवली या गावात त्यांनी जागादेखील विकत घेतली. पण पैशांचे सोंग मात्र आणता येत नाही. समाजाने तसेच दानशूर व्यक्तींनी या रुग्णयज्ञात आपल्या दानाची आहुती दिल्यास मोठे कार्य उभे राहण्यास मदत होईल. वृद्धाश्रम हा केवळ वृद्धाश्रम न राहता ते ‘घर’ बनावे. त्यात आपुलकी, जिव्हाळा आणि प्रेम असावे यासाठी जाधव दाम्पत्य हे सतत प्रयत्नशील आहे. डॉ. जाधव हे केवळ समाजसेवक तसेच रुग्णसेवक नसून कवी आणि कथालेखकदेखील आहेत. हे कार्य करीत असताना आयुष्यात आलेले अनुभव त्यांनी आपल्या कथा व कवितांतून शब्दबद्ध केले आहेत. त्यांचा कथासंग्रह लवकरच प्रकाशित होणार आहे. डॉ. रवींद्र जाधव यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले आहेत. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, दिल्लीतील दलित साहित्य अकादमीच्या वतीने महात्मा फुले फेलोशीप, रोटरी क्लबचे व्यावसायिक सन्मानपत्र, शासनाच्या दारूबंदी विभागाच्या वतीने सन्मानपत्र, आदिवासी समाजभूषण पुरस्कार, अण्णाभाऊ साठे पुरस्कार तसेच आरोग्य मित्र पुरस्काराचा समावेश आहे. माणूसपण आणि माणुसकी जपणाऱया डॉ. जाधव यांनी स्वीकारलेल्या रुग्णसेवेचा वसा अनुकरणीयच आहे.

– [email protected]