जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याची काळजी घ्या! सचिवांना स्पष्ट निर्देश

838

हे माझं म्हणजे सर्वसामान्य जनतेचं आपल्या सर्वांचं सरकार आहे. या जनतेने आपल्यावर विश्वास टाकला आहे. तेव्हा महाराष्ट्राला देशात अग्रेसर करण्यासाठी जी विकासकामे करावी लागतील ती विकासकामे जनतेच्या कराच्या पैशातून होणार आहेत. जनतेच्या घामातून आलेल्या एका पैशाचीही उधळपट्टी होणार नाही याची खबरदारी घ्या, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील सर्व सचिवांना आज दिले.

मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व सचिवांची बैठक बोलावली. या बैठकीत सचिवांची ओळख करून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, जनतेने दिलेल्या करातून विकासकामांसाठी निधी प्राप्त होत असतो. निधीचा योग्यप्रकारे विनियोग करून विकासाला गती देणे आवश्यक आहे. सेवाभावनेने कामे केल्यास जनतेचा विश्वास संपादन करता येईल. ‘सरकार माझे आहे’ अशी विश्वासाची भावना जनतेच्या मनात निर्माण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

शासनाबद्दल जनतेच्या मनात आपुलकी निर्माण करा
जनसेवेसाठी पारदर्शक आणि स्वच्छ कारभारावर अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. शासन आणि प्रशासनाबद्दल जनतेच्या मनात आपुलकीची आणि आदराची भावना निर्माण होण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वांगीण विकास साधताना कामांची गती आणि दिशेलाही तेवढेच महत्त्व आहे. त्या दृष्टीने प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडल्यास सरकार प्रगतीचे उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी होईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुंबईत जन्मलेला पहिला मुख्यमंत्री
जनतेने विश्वासाने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली आहे. माझा जन्म आणि संयुक्त महाराष्ट्राचा जन्म एकाच सालात झाला आहे. महाराष्ट्राचं आणि माझं वय सारखं आहे. नुसतं वय सारखं नाही तर माझ्या आधी जे मुख्यमंत्री झाले त्यामध्ये मुंबईत जन्मलेला मी पहिला मुख्यमंत्री आहे. तेव्हा मुंबईसह राज्याला देशात अग्रेसर करण्याचे स्वप्न घेऊन यापुढे काम करावयाचे आहे. किकासकामांसाठी निधी देताना करदात्याचे उत्पन्नही काढेल याकडेदेखील लक्ष देणे तेकढेच महत्त्काचे आहे. त्याचबरोबर शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीकनात आनंदाचे क्षण आणण्यासाठी किकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवा, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मंत्रालयात जल्लोषी स्वागत झाले. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपासून मंत्रालयातील अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकालाच नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जवळून पाहण्याची ओढ होती. याच ओढीने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून थेट सहाव्या मजल्यापर्यंत प्रत्येक कोपरा कर्मचाऱ्यांच्या गर्दीने व्यापला होता. उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा दिल्या. मुख्यमंत्री कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांचे औक्षणही केले.

आपली प्रतिक्रिया द्या