आरे कारशेड, नाणारला शिवसेनेचा विरोध कायम! उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती

443
uddhav-thackeray


आरेमध्ये मेट्रोची कारशेड उभारण्यास शिवसेनेचा ठाम विरोध आहे. त्याचप्रमाणे नाणार रिफायनरीबाबतच्या शिवसेनेच्या भूमिकेतही कोणताही बदल झालेला नसून स्थानिकांच्या पाठीशी ठामपणे आहोत़ मात्र यामुळे युतीत कोणताही तणाव नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या वेळी कोकण दौऱयादरम्यान नाणारवासीयांचा पाठिंबा पाहिल्यानंतर रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधाचा फेरविचार करावा लागेल. यासाठी पुन्हा नाणारमध्ये येईन असे विधान केले होते. यावरून नाणारवासीयांमध्ये संतापाची प्रचंड लाट उसळली होती. नाणार तसेच आरेविषयी मुख्यमंत्र्यांच्या असलेल्या भूमिकेमुळे युतीवर काही परिणाम होईल का, असा सवाल पत्रकारांनी केला असता याचा कोणताही परिणाम युतीवर होणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

…तर जनतेचा सरकारवरील विश्वास उडेल!
विकासकामाला शिवसेनेचा विरोध नाही. मेट्रो कारशेडलाही विरोध केलेला नाही, पण आरेमध्ये कारशेड करण्यास विरोध आहे. त्याला अकारण नव्हे तर सकारण शिवसेनेचा विरोध आहे. नाणार रिफायनरीला केलेला विरोध हा तेथील स्थानिक जनतेसाठी केलेला आहे. आजही तेथील नागरिकांच्या भावना बदललेल्या नाहीत. तेथील माताभगिनींनी फोन करून आपल्या तीक्र भावना कळवल्या आहेत. त्यांचा आजही या रिफायनरीला ठाम विरोध आहे आणि शिवसेना ठामपणे त्यांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, अशी जर भूमिका बदलायला लागले तर जनतेचा सरकारवरील विश्वास उडेल.

आपली प्रतिक्रिया द्या