कोरोनावरील लस न घेतलेल्यांचा शोध घेणार; आशा कर्मचारी करणार पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी तालुक्यात लस न घेतलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्याचा विचार सध्या आरोग्य विभागाचा आहे. लसीकरण न झालेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी आशा कर्मचारी घरोघरी जाऊन शोध घेणार आहेत. ज्यांनी कोरोनावरील लस घेतलेली नाही त्यांना लस घेण्याचे आवाहन केले जाईल, अशी माहिती तालुका आरोग्यअधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी रत्नागिरी पंचायत समितीच्या मासिक सभेत दिली.

सभापती संजना माने आणि उपसभापती उत्तम सावंत यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी पंचायत समितीची मासिक सभा पार पडली. या सभेमध्ये ग्रामीण विकास यंत्रणेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. महिला बचत गटांच्या आयोजित केलेल्या दिवाळी सरस महोत्सवाचे आयोजन घाईघाईत करण्यात आले. महोत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेवर रत्नागिरी शहराचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी आणि पंचायत समितीच्या सभापती संजना माने यांचे नाव नव्हते. याबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रसिद्धी आणि प्रचारामध्येही यंत्रणा कमी पडल्याने सदस्यांनी आक्षेप घेतला.

डॉ. महेंद्र गावडे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा आढावा दिला. रत्नागिरी तालुक्यात 2 लाख 47 हजार 128 नागरिकांच्या लसीकरणाचे उदिदष्ट आहे. त्यामध्ये 2 लाख 9 हजार 248 नागरिकांनी पहिली लस घेतली. तर 91 हजार 673 नागरिकांनी दुसरी लस घेतली आहे. उर्वरित लसीकरण 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उदिष्ट डोळ्यासमोर ठेवले असल्याचे डॉ.गावडे यांनी सभागृहात सांगितले. आशा कर्मचारी घरोघरी जाऊन ज्यांनी लस घेतली नाही, त्यांचा शोध घेऊन त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त केले जाणार असल्याचे डॉ. गावडे यांनी सांगितले.