कोरोना व्हायरसवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची बुलढाण्याचे डॉ. आशुतोष गुप्त यांच्याशी चर्चा

1906

कोरोनावर नियंत्रण मिळवण्याकरिता आयुष चिकित्सा पद्धतीच्या सहाय्याने काय उपाययोजना करता येतील त्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष क्षेत्रातील निवडक तज्ज्ञांसमवेत समवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली व संवाद साधला. या बैठकीमध्ये केंद्रीय आयुष मंत्री, श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुष सचिव, पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा व देशातील आयुष चिकित्सा पद्धतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या निवडक तज्ञांचा समावेश होता. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचे रहिवाशी व महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडीसीनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्त हे देखील चर्चेत सहभागी झाले होते.

एक तास चाललेल्या या बैठकीमध्ये सध्या आयुष चिकित्सा पद्धतीच्या माध्यमातून स्वस्थ नागरिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढविणे व कोरोनाग्रस्त रुग्णांवर आयुष चिकित्सा पद्धतीच्या सहाय्याने उपचार करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये तज्ञांनी सद्यस्थितीतील विविध बाबींवर प्रकाश टाकून कोरोना विरुद्ध लढ्यामध्ये आयुष चिकित्सा पद्धतीच्या संभाव्य सहभागावर विस्तृत विचार मांडले. यामध्ये आयुर्वेद व अन्य आयुष चिकित्सा पद्धतीच्या सहाय्याने कोरोना व्याधीला करावयाचा प्रतिबंध, कोरोनाग्रस्त रुग्णांवर करावयाचे औषधोपचार, संशोधन, आयुष क्षेत्रातील डॉक्टरांच्या मनुष्यबळाचा सक्रिय सहभाग, आयुर्वेदीय औषध उत्पादक कंपन्यांचा सहभाग इत्यादी विषयावर सविस्तर मतप्रदर्शन केले.

कोरोना विषाणूवर मात करण्यामध्ये चीन सारख्या देशांनी पारंपारिक औषधोपचारांच्या सहाय्याने चांगले यश संपादन केले असून त्यादृष्टीने आयुर्वेदाचा देखील विचार आपल्या देशामध्ये करण्याची विनंती या प्रसंगी पंतप्रधानांना करण्यात आली. याबाबतीत विविध अनुसंधान संस्था व संघटनांच्या माध्यमातून झालेल्या कार्याची व संशोधनाची माहिती देण्यात आली. कोणत्याही चिकित्सा पद्धतीमध्ये सध्या कोरोनावर परिपूर्ण उपचार पद्धती विकसित झालेली नसल्याने आयुर्वेदाचा व आयुष चिकित्सा पद्धतीतील अन्य चिकित्सा पद्धतींचा देखील उपयोग करुन प्रभावी मिश्र उपचार पद्धतीच्या सहाय्याने देखील कोरोनाचा सामना शक्य असल्याचे मत बैठकीत मांडण्यात आले.

सदर बैठकीला स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान बंगलोरचे डॉ. एच. आर. नागेंद्र, पतंजलीचे आचार्य बाळकृष्ण, खा. अनुराग शर्मा, वैद्य पी. आर. कृष्णकुमार, वैद्य देवेंद्र त्रिगुणा, वैद्य जयप्रकाश नारायण, वैद्य विनय वेलणकर, डॉ राजीव वासुदेवन, युनानीचे डॉ हमीद अहमद, डॉ. मनोज नेसरी, प्रो. के. एस. धीमन, भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. जयंत देवपुजारी, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, आयुर्वेद व्यासपीठचे वैद्य संतोष नेवपूरकर, डॉ किरण पंडित, वैद्य. दिलीप गाडगीळ, डॉ. विनायक टेंभुर्णीकर आदी मान्यवर सहभागी झाले होते.

देशाच्या इतिहासात प्रथमच आयुष चिकित्सा पद्धतीला विश्वासात घेऊन त्यांचा देखील या लढ्यामध्ये समावेश केल्याबद्दल तज्ञांनी पंतप्रधानांचे आभार मानले. देशातील आयुष वैद्यकीय व्यवसायींकडून या काळात करण्यात येत असलेल्या सेवेबद्दल व आयुष मंत्रालयाकडून कोरोनाच्या संदर्भात केल्या गेलेल्या कामाबद्दल देखील पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.

पंतप्रधानांनी सदर बैठकीत झालेल्या चर्चेतील मुद्द्यांवर भाष्य केले. केंद्र शासनाने टेलीमेडिसीन संदर्भात मार्गदर्शक सूचना प्रकाशित केल्या असून त्यानुसार सर्व डॉक्टरांनी दक्षता बाळगून सामाजिक संपर्कातून संसर्ग होणार नाही व आपल्याला देखील संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले. आगामी काळात आयुष चिकित्सा पद्धतीच्या सर्व डॉक्टरांचा सहभाग व योगदान शासनाला लागणार असून, त्या दृष्टीने सर्वांनी सिद्ध राहावयाचे आवाहन देखील याप्रसंगी केले.

आपली प्रतिक्रिया द्या