
>> सीए अभिजित कुळकर्णी – योगशिक्षक, भारतीय योग मंदिर
योग म्हटले की, सामान्यपणे आपल्या नजरेसमोर उभी राहते ती आसनांचा अभ्यास करणारी व्यक्ती अथवा ध्यानस्थ बसलेल्या एखाद्या योग्याची मूर्ती!
आसन या संज्ञेचा अर्थ
आसन या शब्दाचे दोन अर्थ होतात. पहिला म्हणजे बैठक, सिंहासन, खुर्ची आणि दुसरा अर्थ म्हणजे शरीराची विशेष स्थिती. योगशास्त्र्ाामध्ये आपले बसण्याचे आसन कसे असावे याचा उहापोह केलेला आहे. तसेच शारीरिक स्वास्थासाठी, लवचिकतेसाठी वेगवेगळय़ा आसनांचा उल्लेखही केलेला आढळतो. पातंजल योगदर्शन आणि भगवद्गीता या दोघांमध्येही आसनांशी संबंधित अशी काही सूत्रे आणि श्लोक आहेत. याशिवाय ‘हठयोगप्रदीपिका’, ‘घेरंडसंहिता’, ‘गोरक्षसंहिता’ इत्यादी अनेक ग्रंथ आसन या विषयाला वाहिलेले आहेत.
आसनस्थ देवी देवता
आपले देवी, देवता, ऋषी आणि मुनी हे ही आपल्याला वेगवेगळय़ा आसनात बसलेले दिसतात अथवा त्यांची तशी वर्णने आढळतात. सृष्टिविधाता ब्रह्मदेव, विद्येची अधिष्ठात्री देवता सरस्वती आणि वैभव ऐश्वर्यादात्री श्री लक्ष्मी या पद्मासनात बसलेल्या दिसतात. योगेश्वर शिवशंकराचे वर्णन करताना ‘पद्मसीनमसमंतात’ अर्थात पद्मासनस्थ शिवशंकराची स्तुती देवगण करतात असे म्हटले आहे. रामरक्षेत श्री रामांचे वर्णन करताना ते बद्धपद्मासनात बसलेले आहेत. ‘बद्धपदमासनस्थं’ असे म्हटले आहे. जैन तीर्थंकर आणि आपल्या अनेक आचार्यांच्या मूर्ती, चित्रे ही स्वस्तिकासन, पद्मासन किंवा सिद्धासनात आढळतात. दूरदर्शनवर येणाऱया पौराणिक धारावाहिकांमध्ये तपश्चर्या करणारी व्यक्ती वृक्षासनात उभी राहिलेली दाखविली जाते.
आसन आणि पातंजल योगदर्शन
आसन हे योगाभ्यासाचे तिसरे अंग असून सध्याच्या युगात या अंगावरतीच सामान्य जणांचा अधिक भर असतो. आसनासंदर्भात पातंजन योगदर्शनात तीन सूत्रे आलेली आहेत.
‘स्थिर सुखमासनं।’
आसन सुखदायक असावे आणि त्यामध्ये दीर्घकाळपर्यंत स्थिरतेने बसता यावे. दीर्घकाळ स्थिरतेने बसायचे असेल तर आसन सहजपणे आणि सुलभतेने करता यायला हवे. त्यासाठी शरीरामधील लवचिकता असायला हवी. आसनातील स्थिरता ही दोन स्तरांवर अभिप्रेत आहे. आपले शरीर अचल आणि संतुलित असावे. मन स्थिर, एकाग्र आणि शांत असावे. आसनाची सहजता आणि स्थिरता कशी साध्य करावी हे पतंजली पुढच्याच सूत्रात सांगतात.
‘प्रयत्नशथिल्यानंतसमापत्तीभ्याम।’
सुरुवातीला आसन किंवा कुठलीही गोष्ट आपण सहजतेने करू शकत नाही. आसनात सहजता आणण्यासाठी प्रयत्न, अभ्यास, सराव करावा लागतो. या सरावानेच शरीरात लवचिकता येते आणि लवचिकता आली की, मग सहजता येते. आसन एकदा जमले की, मग स्थिरतेचा अभ्यास करावा लागतो. मनाच्या स्थिरतेचा अभ्यास, इंद्रिय-निग्रह, मनाला अंतर्मुख करणे म्हणजेच ‘अनंतसमापत्ती’
‘ततो द्वंद्वांनभिघातःघ्’
अशा प्रकारे आसन सिद्ध झाले की, मग डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूनेही एकाच लवचिकतेने आसन करता येते. मन एकाग्र राहते. अशाप्रकारे एखाद्या आसनात एक प्रहार म्हणजे तीन तास बसता आले तर त्याला ‘आसनविजय’ असे म्हणतात.
ध्यानोपयोगी आसन
आसनांचे मुख्यत्वे दोन भाग पडतात. पहिल्या वर्गात ध्यानोपयोगी आसने अर्थात वज्रासन, स्वस्तिकासन, सुखासन, पद्मासन, सिद्धासन इत्यादी आसनांचा समावेश होतो. दुसऱया वर्गात शारीरिक लवचिकतेसाठी आणि सुस्वास्थ्यासाठी केल्या जाणाऱया आसनांचा समावेश होतो.
ध्यानोपयोगी आसन कसे करावे याचे उत्कृष्ट आणि सुंदर वर्णन स्वयं योगेश्वर श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत केले आहे.
समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः।
संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्।।
अर्थात शरीर, मान आणि मस्तक सरळ असावे. पाठीचा कणा ताठ आणि हनुवटी जमिनीला समांतर ठेवावी. शरीर अचल आणि मन स्थिर असावे. डोळे बंद करून (अर्धोन्मीलित नेत्रांनी) आपले ध्यान भ्रूमध्यात अर्थात दोन्ही भुवयांच्या मधोमध ज्या ठिकाणी आज्ञाचक्र असते, जिथे आपण टिळा लावतो किंवा कुमकुम लावतो तिथे पेंद्रित करावे. पाठीचा कणा ताठ ठेवल्याने शरीरातील चेतना, शक्ती ऊर्ध्वगामी होण्यास सहाय्यता मिळते आणि ध्यानामुळे योगसाधकात एक अद्भूत चैतन्य, ऊर्जा, उत्साह प्रवाहित होतो.


























































