कॉक्रोच जनता पार्टीची अधिकृत वेबसाईट बंद; अभिजीत दीपके, म्हणाला झुरळे कधीच मरत नाहीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या सात ते आठ दिवसांपासून संपूर्ण राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर कमालीची खळबळ उडवून देणाऱ्या अभिजीत दीपके यांच्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’वर आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. सोशल मीडियानंतर पक्षाचे अधिकृत संकेतस्थळ आता पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांना ‘कॉक्रोच जनता पार्टी’मध्ये सहभागी होण्यासाठी सदस्यत्व नोंदणी करता येत होती. पण आता ही वेबसाईटच बंद पाडल्याने ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे पुढे काय होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अधिकृत संकेतस्थळ बंद करण्यापूर्वी गेल्यादोन ते तीन दिवसांत ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) अकाऊंट आणि त्यानंतर ‘इन्स्टाग्राम’ अकाऊंट देखील बंद करण्यात आले होते. सोशल मीडियावर या पार्टीला नेटकऱ्यांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता आणि अवघ्या काही दिवसांतच या दोन्ही प्लॅटफॉर्मवर पक्षाचे लाखो सदस्य जोडले गेले होते. मात्र, आधी एक्स, मग इन्स्टाग्राम आणि आता थेट अधिकृत वेबसाईटच बंद झाल्यामुळे संबंधित यंत्रणांनी अभिजीत दिपके यांना लागोपाठ तिसरा मोठा झटका दिला आहे. या संपूर्ण कारवाईनंतर आता कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके काय प्रतिक्रिया देणार किंवा काय कायदेशीर पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अभिजीत दिपके यांनी एक्सवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सरकारने आमची प्रतिष्ठित वेबसाइट बंद केली आहे. http://cockroachjantaparty.org . आमच्या वेबसाइटवर 1 लाख झुरळांनी सदस्य म्हणून नोंदणी केली होती. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 6 लाख झुरळांनी एका याचिकेवर सह्या केल्या होत्या. सरकारला झुरळांची इतकी भीती का वाटते? पण हे हुकूमशाही वर्तन हिंदुस्थानातील तरुणांचे डोळे उघडत आहे. आमचा एकच गुन्हा आहे की आम्ही स्वतःसाठी एका चांगल्या भविष्याची मागणी करत होतो. पण तुम्ही इतक्या सहजपणे आमची सुटका करू शकत नाही. आम्ही सध्या आमच्या नवीन घराच्या निर्मितीवर काम करत आहोत. झुरळे कधीच मरत नाहीत, असे म्हटले आहे.