
जे. डी. पराडकर । संगमेश्वर
मंद गंधाची लयलूट म्हणजे कवठी चाफा, आसमंतातील दरवळ म्हणजे कवठी चाफा, नाजूक तरीही टवटवीत सौंदर्य म्हणजे कवठी चाफा, गंधातून सर्वदूर उमटणारे अस्तित्व, म्हणजे कवठी चाफा! एखाद्या फुलाचे एवढे सुंदर वर्णन करण्यासाठी त्याफुलाचा आकार आणि गंध भाग पाडतात, त्यावेळी फुलांच्या सामम्राज्यातील कवठी चाफ्याचे महत्व आपोआप अधोरेखित होते.
श्रावण महिना म्हणजे वाऱ्याची हलकी झुळूक, उन पावसाचा खेळ, व्रतवैकल्य आणि सणांची रेलचेल. अशा मन प्रफुल्लित करणाऱ्या वातावरणात निसर्गदेवतेने कवठीचाफ्याला दिलेला बहर म्हणजे गंधवेड्यांसाठी जणूपर्वणीच! मानवाबरोबरच देव्हाऱ्यातील देवही, कवठी चाफ्याच्या गंधासाठी नक्कीच आतूर असतील. ज्या फुलांचे कधी निर्माल्य होवू नये असे वाटते, असा कवठी चाफा आपल्या गंधाने प्रत्येकाच्या अगदी हृदयापर्यंत अलगद जावून स्थिरावतो.
गंध देणारी अनेक फुले आहेत. मात्र यात कवठी चाफ्याने स्वतःचे उच्चस्थान अबाधित राखले आहे. चाफ्यात अनेक प्रकार असले तरी, चाफ्याचे प्रत्येक फुल काही खास वेगळेपण घेऊन फुलत असते. पांढरा कवठी चाफा या झाडाला थोडे ऊन असले, तरी पुरते. याची वाढ हळूहळू होते. फुले लहान आणि गोल आकाराची तर, कडक पांढऱ्यापाकळ्या असतात. सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी यांचा सुगंध वातावरणात पसरतो. एकच फूल झाडावर दोन दिवस राहते व सुगंध देते. याची लांबट पाने सुद्धा शोभिवंत असतात. झाडे आटोपशीर आणि त्यांचा विस्तार उभा होतो. पिवळा कवठी चाफा, मंदगतीने वाढणारे, मोठ्या जाड पानांचे असे हे झाड असते. याची पाने रबरट्रीसारखी चमकदार असतात. गोलमोठय़ा आकाराची फुले येतात. सूर्योदयानंतर दिवसभर त्यांचा सुगंध दरवळत राहतो. या झाडांना सावली आवडते. खूप हळूहळू वाढत असल्यामुळे व पाने झाडावर खूप काळ राहिल्याने कचरा होत नाही.
ही दोन्ही झाडे हळू वाढणारी, सावली आवडणारी आहेत. त्यांच्या जुन्या फांद्यांवर गुटी कलमे करून त्याची अनेक झाडे करता येतात. सावलीत वाढ चांगली होते, फारशी निगा राखावी लागत नाही. कीड व रोगांचा प्रादुर्भाव फारसा होत नाहीच. घराच्या कोपऱ्यात जिथे परावर्तित प्रकाश येतो, तिथे लावल्यास छान वाढतात. कवठी चाफ्याचा छोटा वृक्ष असतो. कवठ पिकल्यावर जसा गोडसर वास येतो तसाच वास या चाफ्याच्या फुलाला येतो. त्यावरूनच याचे नाव कवठी चाफा असे पडले असावे. हिमालय आणि निलगिरी पर्वतरांगा अशा थंड प्रदेशात कवठी चाफा अधिक आढळतो. फूल हिरवट पांढरे आणि गोलाकार असते. फुलात मॅग्निलिया हे सुवासिक तेल असते. कवठी चाफ्याचे पांढरे शुभ्र फूल तिन्हीसांजेला उमलते; सकाळपर्यंत याच्या पाकळ्या गळून जातात. कवठी चाफ्याच्या पोटजाती पुष्कळ असल्या तरी त्यांतील भेद मामुली आहेत.

























































