
निलेश घायवळ टोळीतील दोन वर्षांपासून फरार असलेल्या सराईत आरोपीला खंडणीविरोधी पथक एकने वसईतून अटक केली आहे. जयेश कृष्णा वाघ (वय 31, रा. वसई, जि. पालघर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून नोव्हेंबर 2019 पासून तो फरार होता.
कोथरूड पोलीस ठाण्यातंर्गत दोन वर्षांपासून फरार असलेल्या घायवळ टोळीतील एकजण वसई परिसरात असल्याची माहिती पोलीस नाईक राजेंद्र लांडगे व नितीन रावळ यांना मिळाली. त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे तांत्रिक तपास करून आरोपीच्या ठावठिकाणाची माहिती काढण्यात आली. त्यानंतर एपीआय संदीप बुवा, राजेंद्र लांडगे, नितीन रावळ, प्रफुल्ल चव्हाण यांच्या पथकाने शनिवारी दुपारी आरोपी जयेश वाघ याला वसईतून अटक केली. त्याला कोथरूड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी सुरेंद्रकुमार देशमुख, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संदीप बुवा, नितीन कांबळे, राजेंद्र लांडगे, नितीन रावळ, विवेक जाधव, प्रफुल्ल चव्हाण यांनी केली.



























































