पोलिसांवर हल्ला करणारा मोक्कातील फरारी अटकेत; 12 लाख 50 हजारांचा ऐवज जप्त

पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या मोक्कामधील कुविख्यात आरोपीला गुन्हे शाखेच्या युनीट पाचने अटक केली. त्याने केलेले घरफोडीसह वाहनचोरीचे 12 गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी 12 लाख 50 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. जयसिंग उर्फ पिल्लुसिंग कालुसिंग जुनी (वय 28, रा. बिराजदारनगर, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

घरावर दरोडा टाकत असताना आलेल्या कोथरुड पोलिसांना हत्याराने ठार मारण्याचा प्रयत्न करून आरोपी जयसिंग जुनी फरार झाला होता. त्याच्यासह टोळीविरूद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मागील काही महिन्यांपासून गुन्हे शाखेच्या युनीट पाचकडून आरोपीचा शोध घेतला जात होता. दरम्यान, जयसिंग मुलीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार विनोद शिवले, अकबर शेख आणि पृथ्वीराज पांडोळे यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पथकाने साध्या वेशात 24 तासात आरोपीच्या घराजवळ दबा धरून सापळा रचला. त्यानंतर तो पहाटेच्यावेळी गुपचुप मुलीस भेटण्यासाठी आला असता, पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली. त्यावेळी जयसिंगने स्वतःला मारुन घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा प्रयत्न हाणून पाडत त्याला जेरबंद केले. चौकशीत त्याने साथीदार पाप्पासिंग दुधानी (रा. हडपसर) याच्यासह पुणे शहरात दुचाकीसह मोटारींची चोरी आणि घरफोडी केल्याची कबुली दिली.

जयसिंगने आठ ठिकाणी घरफोडी आणि चार वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त भाग्यश्री नवटके, पोलीस आयुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, एपीआय प्रसाद लोणारे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, रमेश साबळे, दया शेगर, विनोद शिवले, अकबर शेख, पृथ्वीराज पांडोळे, महेश वाघमारे, प्रमोद टिळेकर, विशाल भिलारे, प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, अजय गायकवाड, चेतन चव्हाण, आश्रुबा मोराळे, दत्ता ठोंबरे, अमर उगले, दिपक लांडगे, संजयकुमार दळवी, स्नेहल जाधव, स्वाती गावडे यांनी केली.

15 दिवसांच्या मुलीला भेटायला आला अन् अडकला
आरोपी जयसिंग जुनी सराईत असून त्याच्याविरूद्ध विविध पोलीस ठाण्यातंर्गत वाहनचोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. 15 दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीने मुलीला जन्म दिला होता. त्यामुळे मुलीला पाहण्यासाठी जयसिंग येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पहाटेच्यावेळी अंधारात जयसिंग आला असता, पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या