फसवणूक प्रकरणातील रवींद्र बऱ्हाटेच्या फरार साथीदाराला बेड्या; गुन्हे शाखेच्या युनीट एकची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जमिनीच्या व्यवहारात फसवणूक करून तडजोडीअंती 3 कोटी रूपयांची मागणी करणाऱ्या आणि मोक्कातंर्गत दाखल गुन्ह्यात फरार असलेल्या रवींद्र बऱ्हाटे याच्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या युनीट एकने अटक केली. प्रशांत पुरूषोत्तम जोशी (वय 46, रा. कोथरूड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रवींद्र बऱ्हाटे, देवेंद्र जैन, शैलेश जगताप, परवेझ जमादार, जयेश जगताप, प्रशांत जोशी यांच्यासह इतरांविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे.

तक्रारदार तरूणाची पर्वती सहकारनगरमध्ये असलेली जमीन बळकाविण्याच्या हेतूने रवींद्र बऱ्हाटे याच्यासह साथीदारांनी हस्तक पाठविला होता. त्याशिवाय जमीन व्यवहारात तडजोडीसाठी 3 कोटींची मागणी केली होती. याप्रकरणी संबंधित आरोपींविरूद्ध मोक्कानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून आरोपी प्रशांत जोशी फरार झाला होता. तो कोथरूड परिसरातील नातेवाईकांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस अमंलदार सचिन जाधव आणि दत्ता सोनवणे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून प्रशांत जोशीला ताब्यात घेत चतुःशृंगी पोलिसांच्या स्वाधीन केले. याआधी या गुन्ह्यातील आरोपी प्रकाश फाले (वय 41, रा. सांगवी, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी सुरेंद्रनाथ देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, विजेसिंग वसावे, अशोक माने,अय्याज दड्डीकर, इम्रान शेख यांनी केली.