‘त्या’ बेस्ट ड्रायव्हर आणि कंडक्टरांची वेतनवाढ रोखली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळात डय़ूटीवर हजर न झालेल्या बेस्टच्या ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना नोकरीवर पुन्हा घेतले असले तरी त्यांच्या दोन वर्षांची वेतनवाढ मात्र रोखण्यात आली आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा बजाविण्यासाठी कामावर दाखल न झालेल्या अशा 121 जणांची दोन वर्षाची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. त्यामुळे अशा ड्रायव्हर आणि कंडक्टरांना आर्थिक फटका बसणार आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये लोकलसह सर्व परिवहन सेवा ठप्प असताना बेस्टने मात्र अत्यावश्यक कर्मचाऱयांसाठी सुरूवातीपासून आपली सेवा चालविली. मुंबई शिवाय विरार, पनवेल आणि बदलापूर येथूनही मुंबईच्या दिशेने बस चालविल्या. बऱयाच कर्मचाऱयांनी रेड झोन तसेच कंटेन्टमेंट झोनमुळे तर काही जणांनी अगदी मार्चपासूनच सेववर येणे बंद केले. त्यामुळे बेस्टला अत्यावश्यक सेवा देताना तारेवरची कसरत करावी लागली. अनेक कर्मचाऱयांना कोरोना झाल्यानेही बेस्टला कामगारांची टंचाई जाणवू लागली. मर्यादित फेऱयांमुळे बेस्टमध्ये गर्दीचा सामना करावा लागला. बेस्टला दररोज 1600 च्या आसपास फेऱया सोडाव्या लागल्या.

त्यामुळे सुरूवातीपासून गैरहजर असणाऱया कर्मचाऱयांना चार्जशिट देण्यास बेस्ट प्रशासनाने सुरू केले. त्यानंतर अनेकांवर बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली. आतापर्यंत 184 जणांना बडतर्फ करण्यात आले. बडतर्फ केल्यानंतर पुन्हा सेवेत घेण्यासाठी कर्मचारी संबंधित विभागाकडे दाद मागू शकतात व सुनावणीही होते. दोन वेतनवाढ किंवा त्यापेक्षा जास्त वेतनवाढ रोखून त्या कर्मचाऱयाला सेवेत पुन्हा रुजूही करण्याचाही नियम आहे. त्यानुसार बडतर्फ चालक-वाहकांनी अपीलही केल्यानंतर आतापर्यंत 184 पैकी 121 जणांना सेवेत रुजू करण्यात आले असले तरी त्यांची दोन वेतनवाढ रोखण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱयांचे दोन वर्षे आहे तेवढेच वेतन राहणार आहे.