एसी लोकलचा पुन्हा बिघाडाचा शुक्रवार !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पश्चिम रेल्वेवर गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या वातानुकूलित लोकलच्या मागे लागलेले बिघाडाचे शुक्लकाष्ठ कायम आहे. सकाळी ऐन गर्दीच्यावेळी एसी लोकलची वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने तिला यार्डात पाठविण्याची नौबत पश्चिम रेल्वेवर आली. काही तासांच्या दुरुस्तीनंतरही ही गाडी सायंकाळी पुन्हा प्रवाशांच्या सेवेसाठी हजर झाली. विशेष म्हणजे गेल्या शुक्रवारीही एसी लोकलमध्ये बिघाड झाल्यानंतर तिला यार्डात पाठविण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी ७.५४ वाजता या लोकलमधील तीन डब्यांमधील एसी अचानक बंद पडले. याबाबत प्रवाशांनी गोंधळ घालत मोटरमनच्या कानावर ही गोष्ट घातली. मात्र, मध्येच लोकल थांबविता येत नसल्याने लोकलच्या फेऱया सुरूच ठेवण्यात आल्या. लोकलचे दरवाजे स्वयंचलित असल्याने व त्याचे नियंत्रण मोटरमनच्या केबिनमध्ये असल्याने प्रवाशांचा गुदमरून जीव कासावीस झाला. त्यात एका प्रवाशाने रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना ट्विट करून ही घटना कळविली.