
सामना प्रतिनिधी । मुंबई
पश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेलाही वातानुकूलित लोकल मिळणार आहे. ही लोकल आता मुख्य, हार्बर की ट्रान्सहार्बर मार्गावर चालवायची याचा विचार सुरू आहे. ही लोकल बारा डब्यांची असणार असून अशा एकूण 10 लोकल मुंबईत येणार आहेत.
त्यापैकी चार एसी लोकल मध्य रेल्वेला मिळणार आहेत. पश्चिम रेल्वेवर 25 डिसेंबर रोजी पहिली वातानुकूलित लोकल धावण्यास सुरुवात झाली. ही लोकल आठवड्याच्या केवळ पाच दिवस चालविली जाते. या लोकलच्या चर्चगेट ते विरार 12 फेऱ्या चालविल्या जात असून नॉन पिकअवरमध्ये ही गाडी रिकामी धावत असते.
मध्य रेल्वेला मिळणारी एसी लोकल हार्बरच्या सीएसएमटी ते गोरेगाव मार्गावर चालविण्याचा पर्याय तपासून पाहिला जात आहे. कारण लोकलचे तिकीट दर जादा असल्याने पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना ते परवडतील हा विचार त्यामागे असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. तर मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण किंवा बदलापूर दरम्यानदेखील ही गाडी चालविण्याचा विचार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.





























































