
कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे गावानजीक मुंबई –नागपूर महामार्गावर आई वडिलांसह पायी जाणाऱ्या चार वर्षांच्या मुलाला कारने पाठीमागून धडक दिली. या अपघातात आई,वडील जखमी झाले असून चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी कार चालकांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील तळेगाव मळे येथील प्रकाश पांडुरंग मोरे (30) बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास तळेगाव मळे शिवारात मुंबई नागरपूर महामार्गावरून पत्नी रेणुका आणि 4 वर्षांचा मुलगा कार्तिकसोबत पयायी जात होते. त्यावेळी वेगात आलेल्या कारने त्यांना मागन धडक दिली. कार कोपरगावकडुन वैजापुरकडे जात होती. या अपघातात प्रकाश आणि रेणुका जखमी झाले आहेत. तर चार वर्षांच्या कार्तिकचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी प्रकाश मोरे यांनी गुरुवारी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मोरे यांनी पोलिसांना काळ्या रंगाच्या कार असल्याचे सांगत तिचा नंबरही दिला आहे. पोलिसांनी कार चालकाविरोधात मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक गवसने करीत आहेत.



























































