
सामना प्रतिनिधी । शिरोळ
नृसिंहवाडी येथे भावासोबत मोटरसायकलवरून जात असताना ट्रॅक्टरच्या धडकेत मोटरसायकलवरील महिला जागीच ठार झाली. स्वाती लक्ष्मण पाटील ( वय 32, रा. नागावकवठे,ता. तासगाव, जिल्हा सांगली) असे मृत महिलेचे नाव आहे. नृसिंहवाडी नजीकच्या पेट्रोल पंपाजवळ दुपारी दीड वाजता अपघात झाला. याबाबत शिरोळ पोलिसात नोंद झाली आहे.
पोलिसांनी सांगितले की, सांगलीहून सचीन तानाजी पवार ( रा. मनेराजूरी) मोटारसायकलने बहिणीला घेवून नृसिंहवाडीकडे जात होता. त्याची बहीण स्वाती पाटील मोटारसायकलच्या मागील बाजूस होती. नृसिंहवाडीनजीक आल्यानंतर सचिनने लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला मोटरसायकल थांबविली. त्यावेळी उसाने भरलेल्या टॅक्टर ट्रॉलीने मोटरसायकलला मागील बाजूने जोरात धडक दिली. त्यामुळे सचिन रस्त्याच्या बाजूला पडला तर स्वाती रस्त्यावर पडून ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
























































