
शहापूर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर क्रुझर जीप आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना वाशिंद आणि आमने दरम्यान पहाटेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये अब्दुल पाशा शेख (वय 65) आणि जाहीद सिद्दिकी (वय 40) यांचा समावेश आहे. अपघातग्रस्तांमध्ये 2 लहान मुले, 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश असून त्यातील दोन ते तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
ही मंडळी परभणी जिल्ह्यातून भिवंडीतील नातेवाईकांकडे येत असताना हा अपघात घडला. अपघातानंतर जखमींना तात्काळ भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
दरम्यान, मृतदेहांचे पंचनामे करून शवविच्छेदनासाठी भिवंडीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.