शिवज्योत आणण्यासाठी निघालेल्या तरुणाचा औंधजवळ अपघाती मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवज्योत आणण्यासाठी दुचाकीवरून सज्जनगड येथे निघालेल्या युवकांची दुचाकी आणि भरधाव मोटारीची खटाव तालुक्यातील गोपूज येथे रविवारी धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील एक तरुण ठार झाला, तर एकजण जखमी झाला आहे.

धनंजय शिंदे (वय 25, रा. सूर्याचीवाडी, ता. खटाव) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. किरण जाधव (रा. सूर्याचीवाडी) हा गंभीर जखमी झाला आहे. सूर्याचीवाडी (ता. खटाव) येथील तरुण शिवज्योत आणण्यासाठी दुचाकीवरून सज्जनगड येथे निघाले होते. रविवारी रात्री गोपूज-औंध रोडवर राजपथ इन्फ्रा कंपनीजवळ चारचाकी आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीची पुढील बाजू तुटून पडली, तर चारचाकी गाडीने आठ ते दहा पलटय़ा खाल्ल्या. या अपघातात दुचाकीवरील तरुण धनंजय शिंदे यांचा मृत्यू झाला. तर किरण जाधव गंभीर जखमी झाला. मोटारीतील जखमींची माहिती मिळू शकली नाही. अपघाताची माहिती मिळताच, औंध पोलिसांनी तत्काळ धाव घेतली.