
सहा लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी एका नामांकित कंपनीच्या अकाउंटंटला मालाड पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. मनीषकुमार सुरेशकुमार गुप्ता असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार हे एका नामांकित कंपनीत वरिष्ठ पदावर काम करतात. त्याच्याकडे मनीषकुमार हा अकाउंटंट म्हणून सहा वर्षांपासून काम करत होता. कंपनीचे ऑडिट होणार असल्याने त्याला 29 एप्रिलला सर्व व्यवहाराची माहिती सादर करण्यास सांगितले. तेव्हा त्याने सायंकाळपर्यंत माहिती सादर करतो असे सांगितले. त्यानंतर मनीषने फोन बंद करून ठेवला. फोन बंद केल्याने त्या दिवशी ऑडिट झाले नाही. मे महिन्यात एक जण ऑडिटला आले. तेव्हा त्यांना सहा लाख आठ हजार रुपये कमी दिसले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने मनीषकुमारला फोन केला. मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तक्रारदार हे मनीषकुमारच्या घरी गेले. तेव्हा त्याच्या घराला टाळे लावले होते. शेजारील रहिवाशांकडे चौकशी केली असता मनीषकुमार हा बिहारला गेल्याचे सांगण्यात आले. फसवणूक प्रकरणी कंपनीने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. मालाड पोलिसांनी मनीषकुमार विरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक धनंजय लिगाडे यांच्या पथकातील अधिकाऱयाने तपास सुरू केला. मनीषकुमार हा बिहारला असल्याचे समजताच पोलिसांचे पथक तेथे¬ गेले. तेथून मनीषकुमारला अटक करून मुंबईत आणले.




























































