अटकेपासून पळण्यासाठी आरोपीने महिला पोलिसाच्या अंगावर घातली गाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अटकेपासून बचाव करून पळून जाण्यासाठी आरोपीने महिला पोलीस उपनिरीक्षकासह महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचाऱ्याच्या अंगावर चारचाकी गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नायगांवच्या डॉन बास्को शाळेजवळ ही घटना शनिवारी सकाळी घडली आहे. नायगांव पोलिसांनी दोन आरोपी विरोधात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

फसवणुकीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी अजित दयाशंकर मिश्रा याच्यावर आचोळे पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्रे प्रकरणी गुन्हा दाखल होता. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रेखा पाटील यांना आरोपीचा नायगाव येथील डॉन बास्को शाळेजवळील अजंठा बिल्डींगजवळ शोध घेण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचाऱ्यासोबत शनिवारी सकाळी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी अजित याने स्वतःची अटक वाचविण्यासाठी पोलिसांना पाहून फिल्मी स्टाईलने इनोव्हा कारचालक अजय अंकुश गायकरला लवकर गाडी पळव आणि जो कोणी समोर येईल त्यांच्यावर चढव, असं सांगितलं.

चालकाने आरोपीच्या सांगण्यावरून रेखा पाटील आणि महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचारी अमोल आव्हाड या दोघांच्या अंगावर गाडी घातली. प्रसंगावधान दाखवून दोन्ही पोलीस बाजूला झाल्याने थोडक्यात बचावले आहेत. पण महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचारी आव्हाड यांना गाडीची धडक बसून ते जखमी झाले आहेत. आरोपी पळून जात असताना गाडी गेटला अडकून बंद पडली. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यावर अजित मिश्राने पोलिसांशी झटापट करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचाऱ्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अजितवर आचोळे येथे 2 आणि तुळींज येथे 3 असे फसवणूक, अपहार व बनावट कागदपत्रांचे 5 गुन्हे दाखल आहेत.