
पुणे शहरातील विविध भागात भाईगिरी करणाऱ्यांची साखळी तोडण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीएनुसार कारवाईचा तडाखा कायम ठेवला आहे. त्यानुसार संबंधितांना एक वर्षांसाठी येरवड्याऐवजी इतर कारागृहात स्थानबद्ध करण्यात येत आहे. दत्तवाडी परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईताची संभाजीनगर कारागृहात रवानगी केली आहे. आतपर्यंत 67 जणांविरूद्ध विविध कारागृहात स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
साहिल हनिफ पटेल (वय 19, रा. आंबेडकर वसाहत, लक्ष्मीनगर) असे कारवाई करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. त्याने साथीदारांसह दत्तवाडी परिसरात दहशत माजविली होती. कोयता, तलवार, रॉडसह शस्त्राने खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, वाहनांच्या तोडफोडीसह गंभीर गुन्हे केले आहेत. त्याला स्थानबद्ध करण्यासाठी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार साहिल पटेल याला एक वर्षासाठी संभाजीनगर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
भाईगिरी करणारे 67 सराईत स्थानबद्ध
नागरिकांमध्ये दहशत निर्माण सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत 67 गुन्हेगारांना एमपीडीएनुसार कारवाई करून विविध कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. सराईत टोळ्यांसह गुन्हेगारांचा बिमोड करून नागरिकांमध्ये भीतीमुक्त वातावरण तयार करण्यास प्राधान्य देण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.






























































