अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपीला फाशी, जुहू पोलिसांनी केला तपास 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची गळा आवळून हत्या करणाऱया वडीवेल ऊर्फ गुंडाप्पा चीनतंबी देवेंद्रला जुहू पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात वडीवेलला दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

तक्रारदार हे विलेपार्ले येथील नेहरूनगर झोपडपट्टीत पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. तीन वर्षांपूर्वी तक्रारदार याची मुलगी ही दुकानात चहा पावडर आण्यासाठी गेली होती. बराच वेळ होऊ देखील ती मुलगी घरी आली नव्हती. तिच्या घरच्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर तिच्या घरच्यांनी जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली. जुहू पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

तपासादरम्यान पोलिसांनी वडीवेलला चौकशीसाठी ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने मुलीचे अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. हत्या केल्यावर पुरावा नष्ट करण्यासाठी मुलीचा मृतदेह सार्वजनिक शौचालयाजवळ टाकून पळ काढला होता. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. वडीवेल विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलीस निरीक्षक अशोक सावंत हे या गुह्याचा तपास करत होते. पोलिसांनी वडीवेल विरोधात भक्कम पुरावे न्यायालयात सादर केले. तसेच वडीवेल विरोधात दिंडोशी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या गुह्याची सुनावणी नुकतीच पूर्ण झाली. वडीवेलला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.