अखेरच्या श्वासापर्यंत पोलीस! एसीपी प्रकाश बागल सेवानिवृत्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरेगाव डिव्हिजनचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश बागल हे गेल्या फेब्रुवारीसअखेरीस आपल्या 31 वर्षांच्या निष्कलंक सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यावेळी त्यांच्या सहकाऱयांनी आयोजित केलेल्या निरोप समारंभात ते म्हणाले, ‘‘माझा अखेरचा श्वास असेपर्यंत मी पोलीस म्हणूनच राहणार आहे. लोकांसाठी काम करणार आहे.’’

प्रकाश बागल पुढे म्हणाले, मी 1995 साली महाराष्ट्र पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून दाखल झालो. माझे वडील, माझा मोठा भाऊ अशी आमच्या कुटुंबीयांची मिळून 100 वर्षे पोलीस सेवा झाली आहे. आम्ही नियत वयोमानानुसार जरी निवृत्त झालो असलो तरी मी व माझे कुटुंबीय लोकांची सेवा करणार आहोत. अखेरच्या श्वासापर्यंत पोलीस म्हणूनच लोकांना न्याय देणार आहोत. कारण आमच्या नसानसात पोलीस आहे. खुल्या मनाने जनसेवा करण्याचे आमचे रक्त आहे. तेव्हा मी जरी निवृत्त झालो तरी हा देश, हा महाराष्ट्र व मुंबईसाठी मी कधीही धावून येण्याची खात्री देतो, अशी निरोप समारंभाला उत्तर देताना प्रकाश बागल यांनी ग्वाही दिली. गोरेगाव पश्चिम, अमृतनगर येथील एका हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भरगच्च निरोप समारंभात पोलीस उपायुक्त संदीप जाधव आदी प्रमुख मंडळी उपस्थित होती.

मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनीही पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात प्रकाश बागल यांचा गौरव केला. ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पंजाबराव उगले, महेंद्र पंडित, दिलीप सावंत, प्रदीप सावंत यांनी प्रकाश बागल यांच्या कार्यशैलीची मुक्तपंठाने स्तुती केली व त्यांना शुभेच्छा दिल्या.

उत्कृष्ट तपास अधिकारी
प्रकाश बागल यांनी ‘एनएसईएल’च्या महाघोटाळय़ाचा उत्कृष्ट तपास केला होता. 13 हजार गुंतवणूकदारांना 7 हजार कोटी रुपये परत मिळवून दिले होते. त्यामुळे ‘ईओडब्लू’च्या इतिहासात प्रकाश बागल यांचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिले जाईल, असे निरोप समारंभप्रसंगी बहुसंख्य पोलीस अधिकाऱयांनी आपले मत व्यक्त केले.