अलिबाग मधील रेवदंडा येथील चार जणांच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर

3

सामना प्रतिनिधी । अलिबाग 

अलिबाग समुद्र किनारी सीआरझेडचे उल्लंघन करून स्थानिक तसेच उद्योगपती, अभिनेते यांनी अनधिकृत बांधकाम केलेले आहे. याबाबत अलिबाग मधील 58 स्थानिकांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार अलिबाग महसूल विभागाकडून 15 दिवसापूर्वी 5 स्थानिकांच्या वाढीव बांधकामावर कारवाई केली होती. शनिवारी रेवदंडा येथील 4 जणांच्या अनधिकृत बांधकावर महसूल विभागाने बुलडोझर फिरवला आहे. त्यामुळे पुन्हा अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. आज रेवदंडा येथील राजेश कामत, अंजली देसाई, दिलीप सातनाईक, भालचंद्र खोत, दीपाली वानरकर यांच्या अनधिकृत बांधकामावर महसूल विभागाने कारवाई करून वाढीव बांधकामावर बुलडोझर फिरवला.

अलिबागमधील 58 स्थानिकांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रांताधिकारी यांनी कारवाईची नोटीस पाठवली होती. त्यानुसार 15 दिवसापूर्वी नागाव येथील 5 जणांच्या अनधिकृत बांधकामावर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर अलिबागमधील राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन स्थानिकावरील कारवाई थांबविण्यासाठी निवेदन दिले होते. त्यानंतर कारवाई थांबण्यात आली होती. तर काही स्थानिकांनी न्यायालयात जाऊन बांधकाम न पाडण्याबाबत स्थगिती आदेश मिळविले आहेत. तर ज्यांनी न्यायालयाचा स्थगिती आदेश घेतलेला नाही त्याच्यावर कारवाईचा बुलडोझर महसूल विभागाकडून फिरविण्यास सुरुवात झाली आहे.