पुण्यातील हॉटेल ‘युनिकॉर्न’,‘एलरो पब’मधील डांगडिंग बंद; नियमांच्या उल्लंघनप्रकरणी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातत्याने नियमांचे उल्लंघन करणार्‍या आणि रात्री उशीरापर्यंत कर्णकर्कश आवाजात साऊंड सुरू ठेवणार्‍या कल्याणीनगर भागातील नामांकित हॉटेल ‘युनिकॉर्न’ आणि ‘एलरो पब’वर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. पोलिसांनी येथून साउंड सिस्टम आणि डिजे मिक्सर जप्त केले आहेत.

कल्याणीनगर भागात यूनिकॉर्न हॉटेल आणि एलरो पब ही दोन मोठी हॉटेल्स असून याठिकाणी सातत्याने नियमांचे उल्लंघन केले जाते. नियमांचे उल्लंघन करत रात्री उशीरापर्यंत हॉटेल्स सुरू ठेवल्याप्रकरणी यापुर्वी देखील सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली होती. तसेच, ‘ड्राय डे’ असताना मद्यविक्री सुरू ठेवण्यासह परवाना देताना घालून दिलेल्या अनेक तरतुदींचे उल्लंघन झाल्याने या दोन्ही बड्या हॉटेल, पबला उत्पादन शुल्क विभागाकडून टाळे ठोकण्यात आले होते. तसेच, त्यांच्यावर कारवाईसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, यानंतर देखील हॉटेल व्यवस्थापनाकडून सुधारणा होत नसल्याचे दिसून येत आहे.

दोन्ही ठिकाणी रात्री उशीरापर्यंत मोठ्या आवाजात साउंड सिस्टीम सुरू ठेवण्यात येत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती. यानूसार पथकाने सापळा रचून प्रत्यक्ष पाहणी केली असता रात्री दहानंतर साउंड सिस्टीम आणि डिजे मिक्सर सुरू असल्याचे आढळून आले. पथकाने कारवाई करीत साउंड जप्त केले आहेत. हॉटेल व्यवस्थापनाने पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत ध्वनी प्रदुषण अधिनियम नियमावलीचा भंग केल्यामुळे या हॉटेल, पबवर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. वाढत्या आवाजाविरोधात कारवाई केल्याने येथील नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, पुष्पेंद्र चव्हाण यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

कल्याणीनगर भागातील यूनिकॉर्न, एलरो पब येथे रात्री उशीरापर्यंत मोठ्या आवाजात साउंड सिस्टीम सुरू ठेवला जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. यानूसार छापा कारवाई करून दोन्ही हॉटेल्समधील डीजे साउंड जप्त केले असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
– विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सामाजिक सुरक्षा विभाग