
ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 30 जानेवारीला अमोल पालेकर यांना रुग्णालयात दाखल केले त्यावेळी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना व्हेंटिलेटरवरून काढून सामान्य वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांच्या पत्नी संध्या गोखले म्हणाल्या, अमोल पालेकर यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून काळजी करण्याचे कुठलेही कारण नाही.


























































