
गेली चार दशके आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे गुरुवारी सकाळी ठाणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. 90 च्या दशकात दिग्गज अभिनेत्यांच्या लोकप्रियतेच्या लाटेत अविनाश खर्शीकर यांनी स्वतŠची ओळख निर्माण केली होती. टिव्ही मालिकांतूनही ते घराघरांत पोचले होते. चतुरस्त्र अभिनेत्याच्या अकाली एक्झिटमुळे सिनेनाटय़सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
अविनाश खर्शिकर गेली काही वर्षे ठाण्यात राहत होते. ते सहा महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी दहाच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. पण त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. खर्शीकर यांच्यावर जवाहर बाग येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी चित्रपट व नाटय़क्षेत्रातील अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली.
तिन्ही माध्यमांत उमटवला ठसा
90 च्या दशकात अभिनयाबरोबरच अविनाश खर्शीकर यांच्या स्टाईलचीही चर्चा असायची. 1978 साली ‘बंदिवान मी या संसारी’ या चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनयाचा श्रीगणेशा केला. ‘आधार’, ‘आई तुझे थोर उपकार’, ‘घायाळ’, ‘लपवाछपवी’, ‘माफीचा साक्षीदार’, ‘माझा नवरा तुझी बायको’ असे त्यांचे चित्रपट खूप गाजले. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, प्रशांत दामले अशा गाजलेल्या कलाकारांसोबत त्यांनी काम केले होते. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने त्यांनी इंडस्ट्रीत स्वतŠचे स्थान निर्माण केले. ‘चमत्कार’ आणि ‘कानून’ या हिंदी सिनेमांतही त्यांनी काम केले. छोटय़ा पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या ‘दामिनी’ या मालिकेतून ते घराघरात पोहोचले होते. रंगभूमीवरही त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. ’श्याम’, ‘वासूची सासू’, ‘अपराध मीच केला’, ‘सौजन्याची ऐशीतैशी’, ‘लफडा सदन’ या त्यांच्या नाटकांनी रंगभूमी गाजवली. सध्या ते शेमारू मराठी बाणाचे काम पाहत होते.
38 वर्षे ‘श्याम’ची भूमिका
अविनाश खर्शीकर यांचे रंगभूमीवर प्रेम होते. पु. ल. देशपांडे लिखित ‘तुझं आहे तुझपाशी’ या नाटकातील श्यामच्या भूमिकेने त्यांना ओळख मिळवून दिली. 1978 सालापासून जयंत सावरकर, रवी पटवर्धन, अविनाश खर्शीकर हे तीन कलाकार ‘तुझं आहे तुजपाशी’ मध्ये काम करत होते. या नाटकाचे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर प्रयोग झाले होते. खर्शीकर यांनी केलेली श्यामची भूमिका नाटय़रसिकांच्या कायम लक्षात राहील.






























































