
प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना काल ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या प्रयोगावेळी दुखापत झाली. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या महानाटय़ाचे प्रयोग काही दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहेत.
कराडमधील कल्याणी मैदानावर 28 एप्रिलपासून ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग सुरू आहेत. रविवारी प्रयोगादरम्यान एण्ट्री घेताना घोडय़ाचा मागचा पाय दुमडला आणि डॉ. कोल्हे यांच्या पाठीला जर्क बसला. त्यामुळे त्यांच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली. वेदना होत असतानाही मध्येच प्रयोग न थांबवता त्यांनी रविवारी पेनकिलर आणि मसाज घेऊन शिवपुत्र संभाजी महानाट्याचा प्रयोग केला. आज महाराष्ट्र दिनाचा प्रयोग करून पुढील उपचारांसाठी मुंबईत येणार असल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.
‘अचानक उद्भवलेल्या दुखापतीमुळे मी सांगू इच्छितो की, 1 मे रोजीचा कराडचा प्रयोग शेवटचा असेल. 11 मेपासून पिंपरी-चिंचवडमध्ये ठरल्याप्रमाणे प्रयोग होणार आहेत. मी छत्रपतींचा इतिहास तुम्हाला सांगत राहणार आहे, असे कोल्हे म्हणाले.

























































