अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना राणावत वादाचा तपास सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई ः अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना रानावत यांच्यातील ई-मेल वाद प्रकरणाचा मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने नव्याने तपास सुरू केला आहे. या प्रकरणी लवकरच हृतिक रोशनचा जबाब नोंदविण्यात येणार आहे.

हृतिक आणि कंगना यांच्यात बराच वाद पेटला होता. त्या प्रकरणाचा तपासदेखील सुरू झाला होता. मात्र 2016पासून तो तपास थांबला होता. आता सीआययूने नव्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हृतिकने आपल्याला काही खासगी व रोमँटिक ई-मेल पाठवल्याचा आरोप कंगनाने केला होता. त्यावरून वादाची ठिणगी पेटली आणि वाद चांगलाच चिगळला. त्या वेळी हृतिकने सर्व आरोप फेटाळत कंगनाला आव्हान दिले होते. कंगनानेच मला असंख्य ई-मेल पाठविल्याचा आरोप करीत हृतिकने पोलिसात तक्रार दिली होती. त्याच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र चार वर्षांनंतरही या गुह्याचा तपास जैसे थे आहे. दरम्यान, या रखडलेल्या गुह्याच्या तपासात लक्ष घालून लवकरात लवकर तो संपवावा अशी मागणी महेश जेठमलानी यांनी पोलीस आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर गेल्या डिसेंबर महिन्यात या गुह्याचा तपास सीआययूकडे सोपविण्यात आला. त्यानुसार सीआययूने या प्रकरणाचा आता नव्याने तपास सुरू केला आहे.