
अभिनेत्रीसह पाच जणांना दुबई येथे ड्रगच्या खोटय़ा गुन्ह्यात अडकवणाऱ्या दोघांना क्राइम ब्रँच युनिट 8 ने अटक केली. ज्याच्याकडून अॅन्थोनी पॉल गांजा घेत असायचा, त्यालादेखील आज पोलिसांनी अटक केली. शांतीसिंग राजपूत असे त्याचे नाव असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार महिला यांची मुलगी अभिनेत्री आहे. मार्च महिन्यात पॉलची अभिनेत्रीसोबत भेट झाली होती. भेटीनंतर दुबईला ऑडिशनला जायचे असे तिला सांगण्यात आले. अभिनेत्रीला विमानाचे तिकीट दिले गेले. करीअर होईल या आशेने अभिनेत्री ही दुबईला गेली. दुबई विमानतळावरून बाहेर पडल्यावर तिला तेथील स्थानिक पोलिसांनी पकडले. हा प्रकार समजताच अभिनेत्रीच्या आईने मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्याचा तपास क्राइम ब्रँच युनिट 10 कडे सोपवला गेला. पोलिसांनी तपास करून बेकरी चालक अॅन्थोनी पॉल आणि राजेश बोभाटेला अटक केली.





























































