
वीज निर्मिती करताना वापराव्या लागलेल्या महागड्या कोळशाचा भार (चेंज इन लॉ अंतर्गत) महावितरणच्या माथी मारण्याचा अदानीचा डाव आता त्यांच्याच अंगाशी आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेडच्या मागणीनुसार वीज नियामक आयोगाने अदानीला महागड्या कोळशाचा दर मंजूर केला आहे. त्यामुळे महावितरणवर कोटय़वधी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. 3
तसेच आतापर्यंत तिरोडा वीज केंद्रात तयार होणाऱया प्रति युनिट विजेचा दर अडीच-तीन रुपये होता तो कोळशाच्या वाढीव दरामुळे साडेतीन रुपयांच्या पुढे गेला आहे. दरम्यान, महावितरण स्वस्त विजेच्या खरेदीला प्राधान्य देत असल्याने सदर प्रकल्पातील वीज महागडी ठरली आहे. त्यामुळे 16 डिसेंबरपासून येथील 1890 मेगावॅटचे तीन वीज संच विजेच्या मागणीअभावी बंद ठेवण्याची नामुष्की अदानीवर ओढवली आहे.
अदानीचा तिरोडा येथे 3300 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक वीज प्रकल्प आहे. येथे तयार होणारी वीज महावितरणला पुरवण्याबाबत करार झालेला आहे. दरम्यान, वीज निर्मिती करताना जादा दराचा कोळसा वापरावा लागत असल्याचे सांगत अदानीने वीज नियामक आयोगाकडे धाव घेतली होती, मात्र 2018 मध्ये वीज आयोगाने त्यास नकार दिल्याने अदानीने अपिलीय वीज प्रधिकरणाकडे दाद मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने कोळशाचा वाढीव खर्च मंजूर करण्याचे निर्देश महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला दिले होते. त्यानुसार आयोगाने वाढीव खर्च महावितरणकडून वसूल करण्यास अदानीला मंजुरी दिली आहे.
महानिर्मितीला लाभ
महानिर्मितीच्या औष्णिक वीज केंद्रात तयार होणाऱया 60 टक्के विजेचा दर अडीच-तीन रुपयांच्या घरात आहे. तर भुसावळ, परळी, कोराडी वीज केंद्रातील काही संचातून तयार होणाऱया विजेचा प्रतियुनिटचा दर तीन-सवातीन रुपये आहे. जादा दरामुळे आतापर्यंत महावितरण या वीज संचातून वीज घेणे टाळत होती, पण आता अदानीच्या विजेचा दर जास्त झाला आहे. त्यामुळे महावितरण महानिर्मितीच्या भुसावळ, परळी, कोराडी या वीज केंद्राची वीज अदानीच्या आधी घेत आहे.
कोळशाच्या वाढीव खर्चाची मागणी मंजूर झाल्याने अदानीला एकीकडे दिलासा मिळाला असला तरी याच वाढीव खर्चामुळे त्याचा प्रतियुनिट विजेच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळेच गेल्या पाच-सहा दिवसांपासून मागणीअभावी तिरोडा वीज केंद्रातील वीज निर्मिती रोडावल्याचे दिसत आहे. – डॉ. अशोक केंडसे, वीजतज्ञ





























































