
माझगाव येथील दिवाणी सत्र न्यायालयात दाखल खटल्यातील निकाल बाजूने देण्यासाठी तक्रारदाराकडे 25 लाखांची मागणी करून त्यापैकी 15 लाख स्वीकारताना अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने लिपिक चंद्रकांत वासुदेव (40) यांना रंगेहाथ पकडले. तर या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन काझी यांचाही हात असल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
चंद्रकांत वासुदेव यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अमरीश (नाव बदललेले) यांनी एक याचिका दाखल केली होती. हे प्रकरण माझगाव दिवाणी सत्र न्यायालयातील कोर्ट क्र. 14 येथे होते. यामध्ये निकाल बाजूने देण्यासाठी या कोर्टातील लिपीक वासुदेव यांनी अमरीश यांच्याकडे स्वतःसाठी 10 लाख व न्यायाधीशांसाठी 15 लाख रुपयांची मागणी केली. मात्र लाच द्यायची नसल्याने अमरीश यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोचे कार्यालय गाठून तक्रार दिली. त्यानुसार अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात चंद्रकांत वासुदेव यांना 15 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर चंद्रकांत यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन काझी यांना संपर्क साधून लाचेची रक्कम स्वीकारल्याचे सांगितले. त्यावर काझी यांनीदेखील संमती दर्शवली होती.






























































