
हस्ताच्या उत्तरार्धात एखादा मोठा गडगडाटी पाऊस पडला की आढळा धरण काही तासांत पूर्ण क्षमतेने भरेल, पण पाऊस नाहीच पडला तरीदेखील दोन-तीन दिवसांत हे धरण भरण्याची शक्यता आहे. अकोले, संगमनेर आणि सिन्नर तालुक्यांमधील 16 गावांच्या सिंचनाची काळजी करणारे देवठाणच्या आढळा धरणातील पाणी सांडव्यावरून झेपावण्यास आता सज्ज झाले आहे.
संगमनेर, अकोले आणि सिन्नर तालुक्यांच्या 16 गावांना आढळा धरण कधी भरेल ही एकच चिंता होती. महाराष्ट्रातील सर्व दूरची धरणे भरली असता केवळ 1060 दलघफू क्षमतेच्या आढळा मध्यम प्रकल्पाने मात्र लाभधारकांची चिंता वाढवली होती. पावसाळ्याची सुरुवात होताना 1 जून रोजी धरणात 508 दलघफू पाणीसाठा होता. आज हा साठा 1028 दलघफू इतका आहे. म्हणजे सबंध पावसाळ्यात धरणात केवळ 520 दलघफू नवे पाणी आले. धरणक्षेत्रात पावसाळ्याची सुरुवात ते परतीचा पाऊस या कालावधीत 345 मीमी पाऊस कोसळला. याचा अर्थ 177.11 चौ क़ि मी. एवढे अतिविशाल पाणलोट क्षेत्रात कोसळणारा पाऊस वर्षागणिक घसरणीला लागला आहे. फक्त 2019 आणि 2020 मध्ये पावसाचे प्रमाण बरे होते.
आढळा धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यावर अवलंबून असणाऱया 3914 हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाची चिंता यावर्षी परतीच्या पावसात का होईना मिटली, परंतु धरण भरल्यानंतरही नदी किंवा कालवे काही दिवस वाहिले नाही, तर रब्बी हंगामानंतरचा कालखंड मात्र आढळेला पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा जाईल ही भीती आहेच.
सध्या धरणात 1028 दलघफू इतका पाणीसाठा असल्याने धरण भरल्याची खात्रीच लाभधारकांना आली आहे. हस्त नक्षत्राच्या उत्तरार्धात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट सुरू झाल्याने धरण तर भरेलच, परंतु नदी आणि कालवेही दुथडी भरून वाहतील ही आशा आहे.




























































