अधीर रंजन यांनी राष्ट्रपतींचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ केला! लोकसभेत भाजपचा गदारोळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा आक्षेपार्ह केल्यामुळे लोकसभेत आज या मुद्दय़ावरून प्रचंड गदारोळ झाला. अधीर रंजन यांनी माफी मागावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली. यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. ‘डोण्ट टॉक टू मी’, असे सुनावतच सोनिया सभागृहाबाहेर पडल्या.

दरम्यान, राज्यसभेत खासदार निलंबित करण्याची मालिका आजही कायम राहिली. आज तीन खासदार आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आले. लोकसभेत आज ‘राष्ट्रपत्नी’ हा मुद्दा गाजल्याने महागाई व जीएसटी हे विरोधकांचे मुद्दे अडगळीत पडले. अधीर रंजन यांनी वादग्रस्त विधान करून सेल्फगोल तर केलाच, शिवाय चुकून बोललो मग फाशी देता काय? असे उद्दाम उत्तर दिल्याने सत्ताधाऱयांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले. परिणामी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला आणि संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व निर्मला सीतारामन यांनी अधीर रंजन चौधरी यांनी तत्काळ माफी मागावी, अशी मागणी करत सभागृहाचे कामकाज रोखून धरले. काँग्रेसचा आदिवासी व महिलांबाबत कसा दृष्टिकोन आहे हे या विधानावरून दिसून येते, अशी कडवट टीका इराणी यांनी केल्यानंतर सोनियांनी अधीर यांनी अगोदरच माफी मागितली आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोनिया, इराणी व सीतारामन या तिघींमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर ‘डोण्ट टॉक टू मी’, असे म्हणत सोनिया सभागृहाबाहेर पडल्या.

राष्ट्रपत्नीच्या वादात सोनिया गांधी यांना जाणीवपूर्वक ओढून बदनाम करण्याचा सत्ताधारी पक्ष प्रयत्न करत आहे. यासंदर्भात काँग्रेस लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेऊन तक्रार करणार आहे.

निलंबित खासदारांचे संसद परिसरात 50 तासांचे धरणे आंदोलन

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून महागाई, जीएसटी आणि वाढती बेरोजगारी यावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून लावून धरण्यात आली आहे. ही मागणी आक्रमपणे लावून धरल्याप्रकरणी राज्यसभेतील आणखी तीन खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. यामुळे लोकसभा आणि राज्यसभेतील निलंबित खासदारांची संख्या 27 वर पोहचली आहे.

दरम्यान, निलंबित खासदारांनी संसदेत 50 तासांचे धरणे आंदोलन सुरू केले आहे. राज्यसभेतील आम आदमी पक्षाचे खासदार सुशील कुमार गुप्ता, संदीप पाठक आणि अपक्ष अजित कुमार यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले. आतापर्यंत लोकसभेतील 23 आणि राज्यसभेतील 4 अशा एकूण 27 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. या सर्व निलंबित खासदारांनी संसद भवन संकुलातील गांधी पुतळय़ासमोर 50 तासांचे साखळी धरणे आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता सुरू झालेले हे धरणे आंदोलन शुक्रवारी दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

धरणे आंदोलनात सहभागी खासदारांसाठी विरोधी पक्षांनी खाण्यापिण्यासह आवश्यक सुविधांची व्यवस्था केली आहे. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरसाठी उत्तम प्रकारे तयार केलेले खाद्यपदार्थ असतील. त्यात दही-भात, डोसा, हलवा, चिकन आणि अगदी गाजराच्या हलव्याचाही समावेश आहे.

राज्यसभेतील आणखी तीन खासदारांना आज निलंबित करण्यात आले आहे. यामुळे लोकसभा आणि राज्यसभेतील निलंबित खासदारांची संख्या 27 वर पोहचली आहे. दरम्यान, निलंबित खासदारांनी संसदेत 50 तासांचे धरणे आंदोलन सुरू केले आहे.

चौधरी काय म्हणाले?

अधीर रंजन यांना बुधवारी प्रसारमाध्यमांनी विचारले की, ‘तुम्ही राष्ट्रपती भवनात जात होतात. तुम्हाला जाऊ दिले नाही.’ त्यावर ते म्हणाले, आजही जाण्याचा प्रयत्न करणार. देशाच्या ‘राष्ट्रपत्नी’ सर्वांसाठी आहेत, आमच्यासाठी का नाहीत? या वक्तव्याबद्दल अधीर रंजन माफी मागण्यास तयार झाले असले तरी मी राष्ट्रपतींना भेटून त्यांची माफी मागेन. ढोंगी लोकांची नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

या वक्तव्याचा सोनिया गांधी यांच्याशी काहीही संबंध नसल्याने भाजप त्यांना या प्रकरणात का ओढत आहे याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. मी बंगाली भाषिक असल्याने मला हिंदी उच्चार करताना अडचण होते म्हणूनच अनवधानाने राष्ट्रपत्नी हा उच्चार झाला, असेही ते म्हणाले. भाजपचा गदारोळ जाणीवपूर्वक असल्याचे ते म्हणाले.