मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकरांना पालिकेकडून गढूळ आणि अशुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय काही ठिकाणी पाणी पुरवठाही विस्कळीत असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने याबाबत तातडीने कार्यवाही करून मुंबईकरांना शुद्ध आणि पुरेशा पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.
मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून काही भागात गढूळ आणि अशुद्ध पाणी येत आहे. याबाबत पालिकेसह लोकप्रतिनिधींकडे दररोज शेकडोंच्या संख्येने तक्रारी दाखल होत आहेत. एकतर उन्हाळय़ात मुंबईकरांना पाणी कमी मिळालेच. ऐन पावसाळ्यातही पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने पालिकेच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे आता पालिका आयुक्त-प्रशासक भूषण गगराणी यांनी स्वतः याबाबत पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर केली आहे. शुद्ध पाणी पुरवठा आणि नियमित पाणी पुरवठा केला नाही तर संतप्त मुंबईकर पालिकेला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.