एकजुटीने लढायचं आणि जिंकायचंच – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरी भागात खेळाची मैदाने सध्या आर्टीफिशियल बनली असली तरी मातीत खेळण्याची मजा वेगळी असून मातीचा सुगंधही वेगळा आहे. त्यामुळे मातीची मैदाने टिकली पाहिजेत. मैदान कोणतेही असो, एकजुटीने लढायचं आणि जिंकांयचंच, असा सल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज 48व्या कुमार – मुली राज्य अजिंक्य पद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी राज्यभरातील क्रीडापटूंना दिला.

रोह्यात होणाऱया मैदानी खेळासाठी गावागावातून क्रीडापटू येथे आले आहेत. त्यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले ही खूप मोठी गोष्ट आहे. क्रिकेट खेळाचा प्रसार खेडोपाडी झाला. कारण या खेळाचे प्रशासन गावापर्यंत पोहोचले. त्यामुळेच गावातील मुले या खेळात पुढे आली आणि आपण जगात क्रिकेटमध्ये एक नंबर बनलो. देशाला एकत्र आणण्याचे काम खेळ करतो. महाराष्ट्र काय आहे, हे राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळवून दाखवून द्या. तुम्ही वर्ल्ड कप मिळवण्यासाठी लागणारी ताकद ठेवून खेळा, यश तुमचेच आहे, असेही प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले.

या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आदित्य ठाकरेंसह उद्योजक पुनित बालन, माजी मंत्री आदिती तटकरे, महाराष्ट्र राज्य खो-खोचे अॅड. गोविंद शर्मा, सुरेश मगर, अनिल नवगणे, रायगड जिल्हा खो-खोचे अध्यक्ष अनिकेत तटकरे, उपाध्यक्ष विजय मोरे, अलंकार कोठेकर, जिल्हा सचिव आशीष पाटील आदी उपस्थित होते.

पुणे व ठाण्याची विजयी सलामी
कुमार गटात पुण्याने जालन्याचा 22-8 असा एक डाव 14 गुणांनी पराभव केला. पुण्यातर्फे दिनेश म्हस्कर, विनायक शिंगाडे, यांनी चांगला खेळ करत पुण्याला मोठा विजय मिळवून दिला. मुली गटात ठाण्याने बीडवर 19-9 असा एक डाव 10 गुणांनी विजय मिळवला. ठाण्याच्या धनश्री पंक, प्रीती बालगरे, कल्याणी पंक यांनी बहारदार खेळ केला.

स्पर्धेत सहभागी संघ
आयनॉक्स वॉरियर्स-चेंबूर, वरळी एसएसपी-वरळी, मॅग्निफिसेन्ट – परळ, आवाध इलेव्हन, चंद्रकांत फायटर्स, टर्प ऑडिक्ट्स, श्रीजा इलेव्हन, भांडूप स्ट्रायकर्स, ट्रायडेंट लॉजिस्टिक्स, शौर्य- हर्षित इलेव्हन, पंधारी किंग्ज, फिरोज वॉरिअर्स.